अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपची माघार; ठाकरे गटाकडून आल्या ‘या’ प्रतिक्रिया

मुंबई : भाजपने अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेत मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर ठाकरे गटाकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. तर ऋतुजा लटके यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपने काळजावर दगड ठेवून हा निर्णय घेतला असल्याचा टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे. भाजपने आडमुठेपणा केला अशी टीकाही यावेळी त्यांनी केली. आजच पत्र का दिलं? एक महिनाआधी का दिलं नाही? हा संपूर्ण वाद टाळता आला असता. ऋतुजा लटके यांना मानसिक त्रास झाला तो कसा भरुन काढणार? अशी विचारणाही त्यांनी केली.
लटकेंना ज्याप्रकारे राजीनामा देताना लटकवण्यात आलं होतं, ते लोक विसरु शकत नव्हते, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. भाजपचा आणि संवेदनशीलतेचा काहीही संबंध नसून पराभवाच्या भीतीनेच त्यांनी माघार घेतली, असे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
”भाजपला पराभव दिसत होता”
“भाजपने माघार घेतली कारण भाजपला पराभव दिसत होता. सर्वच एजन्सींनी या पोटनिवडणुकीत भाजप पराभूत होईल, असे सांगितले होते. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या आवाहनानंतर माघार घेणे हा भाजपकडून लावण्यात आलेला हा मुलामा आहे. भाजपला जर संवेदनशील राजकारण आणि संस्कृती कशी जपायची हे माहिती असतं तर कोल्हापूर किंवा पंढरपूरच्या निवडणुकीत त्यांनी उमेदवार दिला नसता”, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे.

“भाजपने या पोटनिवडणुकीतून माघार घेताना राज ठाकरे यांच्या पत्राचं कारण पुढं केलं आहे. मात्र, राज ठाकरे यांच्या पत्राचा परिणाम भाजपवर खरचं होत असेल किंवा भाजप त्यांचे ऐकत असेल, तर महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना महाशक्तीने परत बोलवावे, अशी विनंती करणारे पत्र राज ठाकरे यांनी लिहावं”, असेही त्या म्हणाल्या.
ऋतुजा लटके म्हणाल्या, “मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानते. सर्व पक्षातील जे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्याकडून जी पत्र गेली. त्यांनी जी माझे पती रमेश लटके यांच्या कामाबद्दल आणि त्यांचं प्रत्येकाशी असलेलं सहकार्याचं नातं. प्रत्येकजण म्हणत होतं की माझे सहकारी होते. माझ्या बरोबर होते. त्या कामाची पावती आणि त्यांच्याबरोबर असलेल्या संबंधामुळे आज मला हा सगळ्यांचा आशीर्वाद मिळालेला आहे. त्यामुळे प्रत्येकाचे मी आभार मानते.”






