मुठा नदीवरील नवीन पुल सुरू करण्याआधी हा रस्ता पूर्ण करा ; कर्वेनगरमध्ये सोसायट्यांमधील नागरिकांचे मानवी साखळी आंदोलन..

कर्वेनगर : कर्वेनगरमध्ये आज सोसायट्यांमधील नागरिकांनी एकत्र येत एका महत्वपूर्ण मागणीसाठी मानवी साखळी आंदोलन केले. सध्या सिंहगड रोड सनसिटी ते कर्वेनगरला जोडणाऱ्या मुठा नदीवरील पुलाचे काम जोरात सुरू आहे. पण हा पूल वाहतूकीला खुला करण्यापूर्वी कर्वेनगर मधील राजाराम पूल ते आंबेडकर चौक रस्ता पूर्ण करा अशी मागणी आज सोसायटीमधील नागरिकांनी या आंदोलनाच्या माध्यमातून केली.
विरोध नाही नव्या पुलाला पण आधी पूर्ण करा जुन्या रस्त्याला.. राजाराम पूल ते आंबेडकर चौक रस्ता पूर्ण करा, मगच पूल सुरू करा अशी मागणी कर्वेनगर संघटीत सोसायटी मंचच्या माध्यमातून एकत्र आलेल्या अनेक सोसायट्यांमधील नागरिकांनी रस्त्यावर उतरत मानवी साखळी आंदोलनातून आज केली. या आंदोलनाची तयारी सोसायट्यांमधील नागरिकांकडून अनेक दिवसांपासून सुरू होती. या भागातील सोसायट्यांच्या गेटवरती ‘विरोध नाही जुन्या पुलाला पण आधी पूर्ण करा जुन्या रस्त्याला’ अशा आशयाचे फलक या आधीच लावण्यात आले होते, त्यामुळे या प्रश्नाबाबत जनजागृती चांगली झाली असल्याने मोठ्या संख्येने नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.

शिवणे ते खराडी डीपी रस्त्यामधील कर्वेनगर मधील राजाराम पूल ते दुधाने लॉन्स या टप्प्यात रस्ता झाला असला तरी काही ठिकाणी जागा ताब्यात आल्या नसल्याने रस्ता अपूर्ण अवस्थेत आहे. महालक्ष्मी लॉन्स येथे जागा ताब्यात आला नसल्याने रस्ता रखडला आहे. पुढे वेदांत मंगल कार्यालयाजवळ जागा ताब्यात नसल्याने रस्ता अर्धवट आहे, त्यामुळे हा रस्ता राजाराम पुलाजवळ जोडून म्हात्रे पुलाकडे जाणाऱ्या रस्त्याला जोडता आलेला नाही. दुधाने लॉन्स कडून हा रस्ता पुढे आंबेडकर चौकाला जोडला जाणार आहे. पण त्यासाठी जागा ताब्यात येणे बाकी असून यात अनेक घरे ही रस्त्याच्या कामात बाधित होत आहेत. नदीवरील नवीन पूल सुरू होण्याआधी राजाराम पूल ते आंबेडकर चौक रस्ता पूर्ण होणे गरजेचे आहे. हा रस्ता पूर्ण होण्याअगोदर पुलावरील रस्ता सुरू केल्यास कर्वेनगर भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणूनच आज या भागातील सोसायटीमधील नागरिकांनी एकत्र येत राजाराम पूल ते आंबेडकर चौक रस्ता पूर्ण करण्याची मागणी आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे.
या आंदोलनात सोसायट्यांमधील नागरिकांबरोबर राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक यांनी सहभागी होत या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी उपस्थित महापालिका पथ विभागाचे अधिकारी अनिरुद्ध पावसकर यांना सोसायट्यांच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले.



सिंहगड रोड सनसिटी ते कर्वेनगर जोडणारा मुठा नदीवरील पुल सुरू झाल्यास सिंहगड रोड परिसरातील अनेक वाहनचालक या पुलावरून कर्वेनगर डी पी रस्त्याला येऊन राजाराम पुलाकडून शहराकडे तसेच आंबेडकर चौकाकडून हायवे कडे जाण्यासाठी या मार्गाचा वापर करतील त्यामुळे कर्वेनगर मधील हा अपूर्ण डिपी रस्ता पूर्ण होणे आवश्यक आहे. अन्यथा या डीपी रस्त्यावरून मुख्य रस्त्याकडे जाणाऱ्या अरुंद रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन स्थानिक नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागेल. त्यामुळे प्रशासनाने हा राजाराम पूल ते आंबेडकर चौक रस्ता पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे यासाठी आजचे आंदोलन पार पडले.



