पुण्यात भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; कसब्यात कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी

पुणे : अतिशय प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कसबा मतदार संघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे हेमंत रासने यांचा 11 हजार 40 एवढया मतांनी पराभव केला. कॉंग्रेसच्या धंगेकर यांना 72 हजार 599 तर भाजपचे हेमंत रासने यांना 61 हजार 774 मते मिळाली. भाजपचे सर्व बडे नेते या निवडणूकीसाठी पुण्यात तळ ठोकून होते, मात्र त्याचा उपयोग झाल्याचे दिसत नाही. हा पराभव म्हणजे भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला असून या निकालामुळे राज्याच्या राजकारणावर परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे.
मतमोजणी सुरू झाल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली. त्यांनी घेतलेली आघाडी प्रत्येक फेरीगणिक कमी अधिक झाली मात्र रासने यांना धंगेकर यांची आघाडी पूर्ण कमी करून पुढे जाता आले नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच इतर भाजपचे मोठे नेते या निवडणूकीसाठी कसब्यात तळ ठोकून होते. अतिशय मायक्रो प्लॅनिंग भाजपकडून केले गेले होते मात्र तरीही कसब्यातील मतदारांनी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर साथ देत हेमंत रासने यांचा पराभव करत भाजपला मोठा धक्का दिला आहे.
पैशांचा वापर होऊनही जनतेनं मतदानाच्या रुपाने मला आशीर्वाद दिला आहे. अजित पवार, नाना पटोले, आदित्य ठाकरे यांचा शुभेच्छांसाठी मला फोन आला. मी गिरीश बापट यांची भेट घेणार आहे. ते अनुभवी नेते आहेत. भाजपाकडे हा शेवटचा आधार होता जिंकण्यासाठी. शेवटची शक्ती म्हणून त्यांनी हिंदुत्वाचं कार्ड काढलं होतं. पण मला माझ्या आई-वडिलांनी शिकवलेलं हिंदुत्व होतं. मी सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन जाणारा आहे, अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांनी विजयानंतर व्यक्त केली आहे.




