गणेश विसर्जनापर्यंत पूर्णवेळ पाणीपुरवठा सुरू ठेवा

पुणे : सध्या शहरात गणेशोत्सव साध्या पद्धतीने परंतु उत्साहात सुरू आहे. या काळात जास्त खबरदारी घेण्याची गरज आहे. सातत्याने स्वच्छता ठेवण्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता आहे. अनेक नागरिक घरीच आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जन करून निरोप देणार आहेत. त्यामुळे या उत्सवाच्या काळात शहरात दिवसभर पाणीपुरवठा सुरू ठेवावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिटणीस प्रशांत गांधी यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सध्याच्या काळात जगात कोरोना नामक महामारीने विळखा घातलेलाच आहे. पुण्यात देखील या गंभीर आजाराने सर्वत्र थैमान घातलेले आहेच. श्रावण महिना सुरु झाला कि, अनेक सण-समारंभ साजरे केले जातात. परंतु कोरोनाच्या भीतीने अनेक बंधने येत आहेत.योग्य अंतर ठेवून आपण कोरोना सारख्या आजराला आपण रोखू शकतो. गणेशोत्सव काळात थोडी जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. सर्वांच्या लाडक्या गणरायाचे विसर्जन होणे देखील याच काळात आहे. आपल्या संस्कृतीप्रमाणे मूर्तीचे पावित्र्य राखण्यासाठी विसर्जन करताना नेहमीच्या वापरापेक्षा जास्त पाण्याची गरज पडणार आहे. सध्या पुणे मनपाच्या वतीने टप्प्याटप्प्याने पाणी पुरवले जाते. सुदैवाने पुणे शहराच्या आसपासच्या धरणांमध्ये पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे. म्हणूनच विसर्जनाच्या दिवसापर्यंत चोवीस तास पाणीपुरवठा करावा. अशी मागणी गांधी यांनी केली आहे.
बरेच भाविक घरीच आपल्या लाडक्या गणरायाला घरातुनच निरोप देतील त्यामुळे कोरोनाच्या काळात गर्दी कमी होण्यास मदत मिळणार आहे सणा सुदीच्या काळात घरात पाणी असल्याने नागरिकांची सोय होईल असे गांधी यांनी सांगितले.



