सकाळी सकाळी मुंबई–पुणे एक्सप्रेस वेवर ट्रक उलटला; यंत्रणांनी तत्परता दाखवल्याने वाहतूक सुरळीत

पुणे : मुंबई–पुणे एक्सप्रेस वेवर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर आज (दि.13 मार्च 2026) सकाळी सकाळी अमृतांजन ब्रिज परिसरात मासे वाहतूक करणारा ट्रक उलटला. या अपघातामुळे काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला.

घटनेची माहिती मिळताच आयआरबी पेट्रोलिंग, महामार्ग वाहतूक पोलीस (बोरघाट), डेल्टा फोर्स महाराष्ट्र सुरक्षा बल तसेच मृत्युंजय देवदूत पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करत अपघातग्रस्त ट्रक क्रेनच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी हलविण्याची प्रक्रिया सुरू केली. दरम्यान, ट्रक हटविण्यासाठी लागणाऱ्या वेळेत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लोणावळा मार्गे जुन्या मुंबई–पुणे महामार्गावर वाहतूक वळविण्यात आली. त्यामुळे मोठी कोंडी होण्यापासून दिलासा मिळाला.
क्रेनच्या मदतीने ट्रक सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर एक्सप्रेस वेवरील वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली असून सध्या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.



