
पुणे : राज्य सरकारने केलेला कायदा न्यायालयात टिकला नाही तर निवडणुका लगेचच होऊ शकतात. निवडणुक ही त्रिसदस्यीय प्रभाग पध्दतीनेच होणार आहे. त्यामुळे गाफील राहू नका, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात दिला आहे. त्यामुळे निवडणुका पुढे जाणार, दोन सदस्यीय प्रभाग रचना होणार या सगळ्या वावड्यांना ब्रेक लागला आहे.
अप्पर डेपो येथे महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या स्व. माणिकचंद नारायणदास दुगड हॉस्पिटलचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात अजित पवार यांनी स्पष्टीकरण देतानाच सर्वच वावड्यांना ब्रेक लावला आहे. पवार म्हणाले की, ओबीसी समाजाला आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. यासाठी राज्य सरकारने एकमताने कायदा तयार केला.
त्या अध्यादेशावर राज्यपालांनी देखील स्वाक्षरी केली आहे. परंतु हा कायदा उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयातटिकला नाही तर राज्य निवडणूक आयोग
केंव्हाही महापालिकांच्या निवडणूक जाहीर करू शकते. तसेच दोनचा प्रभाग होणार अशा वावड्या कोणी उठवल्या असे म्हणत आगामी निवडणुक त्रिसदसिय पद्धतीनेच होईल, यामुळे कामाला लागा असे ही पवार यांनी स्पष्ट केले.
पालिकेची मुदत संपत असल्याने निवडणुक होईपर्यंत लढणाऱ्यांना थोडा खर्च जास्त करावा लागणार आहे. पुढील काही दिवसात, महिन्यात एकदम अचानक निवडणूक जाहीर होतील. हे मी सांगतो. पुन्हा मला दोष देऊ नका. नाहीतर म्हणाल आम्हाला फसवलं राव, म्हणून मी सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी सांगतो की, तुम्ही गाफील राहू नका,” असे पवार म्हणाले.




