Covid 19 : कोरोनाबाबत अलर्ट राहण्याचे आरोग्य सचिवांना पत्र

नवी दिल्ली : चीन आणि युरोपमध्ये करोना रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर केंद्र सरकारने सर्व राज्यांना अलर्ट दिला आहे. करोनाच्या नियमांचं पालन केलं जावे, टेस्ट, ट्रॅकिंग, उपचार, वेगानं लसीकरण करावं अशी सूचना केली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी सर्व राज्याच्या तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या अतिरिक्त मुख्य सचिव तसंच आरोग्य सचिवांना पत्र लिहिलं आहे. सामाजिक तसंच आर्थिक गोष्टी सुरळीत सुरु राहाव्यात याकडेही लक्ष देण्यास सांगितलं आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात, नमुन्यांची वारंवार चाचणी करा जेणेकरुन करोनाच्या नव्या व्हेरियंटची वेळेत माहिती मिळेल असं म्हटलं आहे. “दक्षिणपूर्व आशिया आणि युरोपमधील काही देशांमध्ये करोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर १६ मार्चला आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. यावेळी राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशांनी आक्रमक आणि शाश्वत जिनोम सिव्केन्सिंग तसंच नीट लक्ष ठेवण्यास सांगण्यात आलं,” असं भूषण यांनी पत्रात सांगितलं आहे.
करोनाच्या नव्या व्हेरियंटची माहिती मिळवण्यासाठी राजेश भूषण यांनी राज्यं आणि केंदशासित प्रदेशांना जास्तीत जास्त नमुने INSACOG नेटवर्ककडे द्यावेत असं आवाहन केलं आहे. जर नवीन व्हेरियंटची वेळेत माहिती मिळाली तर त्याचा प्रसार होण्यापासून रोखता येईल असं भूषण म्हणाले आहेत. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता यांची नागरिकांना वारंवार आठवण करून देण्यासही सांगण्यात आले आहे.




