अजित पवारांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांना दीपक मानकर यांचा इशारा ; म्हणाले ते जेव्हा पुण्यात येतील..

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बेताल वक्तव्यासाठी पडळकरांना चाप बसायलाच हवा. अजितदादांची माफी मागितल्याशिवाय पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शांत बसणार नाही अशी आक्रमक भूमिका मानकर यांनी घेतली आहे.
मानकर म्हणाले, गोपीचंद पडळकर यांना वाटत असेल आपल्याला महाराष्ट्रात कोणीच काही करू शकत नाही, पण पडळकर जेव्हा पुण्यात येतील तेव्हा त्यांचे कपडे काढले जातील, त्यांना चोप दिला जाईल आणि याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. ज्यावेळी तो येईल त्याला प्रसाद हा नक्की दिला जाईल.
अशाप्रकारे वक्तव्य करणाऱ्या माणसाने स्वतःची क्षमता लायकी ओळखून दादांबद्दल बोलायला पाहिजे. भाजपच्या मेहरबानीने त्याला विधान परिषद मिळाली. त्याची जर खरंच क्षमता असती तर लोकमतमध्ये त्या ठिकाणी आमदार म्हणून विधानसभेत निवडून आला असता ना, पण आपली क्षमता नसताना काहीही बोलायचे हे खपवून घेतले जाणार नाही हे लक्षात ठेवावे असा इशारा मानकर यांनी दिला.
बालगंधर्व चौकात आंदोलन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर याच्या निषेधार्थ बालगंधर्व चौक येथे पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीतर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.



