पुणे शहर

राजकीय दबावाला बळी पडू नका !कोथरूड मतदार संघातील अनियमित पाणीपुरवठ्यावरुन चंद्रकांत पाटील संतप्त

पाणीपुरवठा अधिकारी आणि व्हॉलमनना सूचना

कोथरूड : कोथरूड मतदारसंघातील अनियमित पाणीपुरवठ्यावर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील चांगलेच संतप्त झाल्याचे पाहायला मिळालं. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता, नियमीत पाणीपुरवठा करावा अशा सक्त सूचना त्यांनी यावेळी दिल्या. कोथरुड विधानसभा मतदारसंघातील पाणीपुरवठ्यासंदर्भात महापालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी, व्हॉलमन आणि नागरीक अशी संयुक्त बैठक कोथरूड मधील अंबर हॉल येथे झाली. या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप, कार्यकारी अभियंता शंकर कोडूसकर, कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे विजय नायकल, वारजे-कर्वेनगरचे दीपक राऊत, औंध-बाणेरचे गिरीश दापकेकर, भाजपा कोथरुड  दक्षिण अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, किरण दगडे पाटील, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, दीपक पोटे,  गणेश कळमकर यांच्या सह सर्व माजी नगरसेवक तथा पाणी पुरवठा विभागाचे सर्व‌ अधिकारी, कर्मचारी, व्हॉलमन उपस्थित होते.

Img 20240404 wa0017281298374058713843994116

बैठकीच्या सुरुवातीला नामदार चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मधील विविध भागातील पाणीपुरवठ्याबाबतच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी उपस्थित माजी नगरसेवकांनी अनियमित पाणी पुरवठ्याबाबतच्या तक्रारींचा पाढा वाचला. गेल्या काही वर्षांपासून महापालिका वेगवेगळ्या भागात दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद असल्याचे जाहीर करते. मात्र, त्यानंतर पुढील दोन-चार दिवस पाणीपुरवठा सुरळीत होत नाही.

तसेच, बालेवाडी गावठाण मध्ये ठिकाणी दहा-दहा दिवस पाणीपुरवठा होत नाही. तर एसएनडीटी येथील समान पाणीपुरवठा योजने अंतर्गत पाण्याची टाकी उभारली असली, तरी ते काम निकृष्ट झाले असून, टाकी सुरु होण्यापूर्वीच गळती लागल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच अनेक भागात पाणीपुरवठा करणारे कर्मचारी कामात कुचराई करत असल्याचे निदर्शनास आणले.

त्यावर चंद्रकांत पाटील यांनी संतप्त होत अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. “पुणे महापालिकेच्या २४×७ योजनेअंतर्गत पहिली पाण्याची टाकी बाणेर बालेवाडी मध्ये कार्यान्वित झाली. त्यानंतर उर्वरित पुण्याला मार्गदर्शक ठरेल, असे याचे कार्यन्वयन सुरू झाले. पाण्याच्या टाक्या बांधण्याचे काम सुरू आहे. समान पाणीपुरवठ्यासाठी प्रत्येक घरात मिटर लावण्याचा निर्णय झाला असून, त्याचेही काम सुरू होईल.”

ते पुढे म्हणाले की, “दुसरीकडे पाणीपुरवठ्याबाबत अनेक तक्रारी वारंवार येत आहेत. सदर तक्रारमध्ये अनेक भागात राजकीय दबावामुळे अनियमित पाणीपुरवठा होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे ही बाब खपवून घेतली जाणार नाही. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नये. पाणी ही अत्यावश्यक बाब असल्याने नागरिकांना त्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केल्यास कठोर पावले उचलावी लागतील,” अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

Img 20240404 wa0013281293529802052601663206

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये