मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रकला कारची धडक; चौघांचा मृत्यू

पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पनवेलजवळील माडप बोगद्याजवळ सर्व्हिस रोडवर टायर बदलण्यासाठी उभ्या असलेल्या एका वाहनाला भरधाव वेगात जाणाऱ्या एका इको कारने मागून जोरात धडक दिली. या भीषण अपघातात इको कारमधील दोन प्रवाशांचा जागीच तर दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झालाय. सहाजण गंभीर, तर चारजण किरकोळ जखमी झाले आहेत.
अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. हा अपघात आज मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास झाला आहे. सर्व जखमींना उपचारासाठी पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. लक्ष्मी विठ्ठल कोंढाळकर (वय-२४) व गणेश बाळू कोंढाळकर (वय-२२) अशी अपघातात जागीच मृत्यू झालेल्यांची नावे तर दोन जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असुन, त्यांची व जखमींची नावे अद्याप समजलेली नाहीत.
अपघाताची माहिती मिळताच पळस्पे महामार्ग पोलिस आणि खालापूर पोलिसांसह देवदूत आपत्कालीन पथक आणि आयआरबीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली. पोलिसांनी देवदूत आपत्कालीन पथक व आयआरबीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने जखमींना तत्काळ पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले.



