पुणे शहर

कर्वे रस्त्यावरील दुकानांसमोरील वृक्ष छाटणी मागे अर्थकारण, राजकारण आणि बरेच काही ? अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

कोथरूड : कोथरूड मधील गेले अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या विषयात बुधवार १२ एप्रिल रोजी घडामोडी घडल्या आणि हा विषय अनेक अंगाने पुन्हा एकदा पुढे आला. कर्वे पुतळा चौकातील सारथी सक्सेस स्क्वेअर मधील रस्त्यांच्या कडेने दुकानासमोर असलेल्या झाडांची छाटणी करण्यात आली. परवानगी देऊन या झाडांची छाटणी दुकाने दिसतील अशी बेसुमार पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. दुकानांच्याच फायद्यासाठी हा प्रकार झाला असल्याचे बोलले जात आहे.

चार ते पाच वेळा महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडून या झाडांच्या छाटणीला आतापर्यंत परवानगी देण्यात आली होती. मात्र दुकानांच्या फायद्यासाठी या झाडाची छाटणी होत असल्याचा आरोप करत या विषयाला विरोध करण्यात आला होता. झाडांची छाटणी नाही तर येथील पूर्ण वृक्ष काढण्याचाच डाव असल्याचा आरोप वृक्ष प्रेमींनी त्यावेळी केला होता. येथील वृक्ष छाटण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न करण्यात आले. यात माजी नगरसेवकाच्या राजकीय हस्तक्षेपाची व दबावाची चर्चाही तेवढीच रंगली. या विषयात कोणाचे हात दगडाखाली तर कोणाचे ओले याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

झाडे छाटण्यासाठी आलेल्या कामगारांनाही वाद झाल्यानंतर पळून जावे लागले होते. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. एवढा विरोध असताना, त्याबाबतचे अर्ज दाखल झालेले असताना वृक्ष अधिकारी काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता होती.

बुधवारी १२ एप्रिल रोजी अनेक महिन्यांच्या कालावधीनंतर येथील वृक्ष छाटणी चे काम सुरू झाले. सुरवातीला केवळ झाडांची उंची व थोडा विस्तार कमी केला जाईल असे वाटत असताना काही झाडांच्या फांद्या झाडाच्या मूळ खोडापासून पूर्ण छाटण्यात आल्याचे दिसून येत आहे. येथील काही दुकाने दिसावीत यासाठी झाडाच्या मूळ खोडापासून फुटणाऱ्या फांद्या काढून टाकण्यात आल्या असल्याचा आरोप आता केला जाऊ लागला आहे. या पूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आता होऊ लागली आहे. या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. ही झाडे गेली अनेक वर्ष रस्त्याच्या कडेने आहेत. एवढया वर्षात या झाडांचा धोका महापालिकेच्या अधिकाऱ्यांना व सोसायटीतील पदाधिकाऱ्यांना वाटला नाही का ? या ठिकाणी उंच इमारत उभी झाल्यानंतर यात झालेल्या आलिशान दुकानांसमोरील झाडे अचानक धोकादायक कशी वाटू लागली? धोकादायक होती तर अनेकवेळा परवानगी देऊनही ही झाडे का काढण्यात आली नाहीत? पुढे चौकातच एक भले मोठे झाड विस्तारलेले आहे मग त्यांच्या फांद्या आतापर्यंत वृक्ष अधिकाऱ्यांना धोकादायक का वाटल्या नाहीत ? झाडे छाटू नये यासाठी अधिकाऱ्यांना दमदाटी झाली असेल तर अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार का केली नाही ? परवानगी असताना झाडे छाटू दिली जात नसतील तर सोसायटी पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे दाद का नाही मागितली? असे अनेक प्रश्न या प्रकरणाच्या निमित्ताने उभे ठाकले आहेत.

अशा पद्धतीने रस्त्याच्या कडेने असणाऱ्या दुकानांसमोरील झाडे काढण्यासाठी किंवा छाटण्यासाठी धोकादायक कारण देऊन परवानगी मागितली आणि ती दिली गेली तर पर्यावरणाचा कोणताही विचार न करता शहरातील बहुसंख्य झाडे काढावी लागतील आणि श्वास घेण्यासाठी कृत्रिम ऑक्सीजन ची सोय करावी लागेल एवढेच या निमित्ताने म्हंटले जात आहे. वृक्षप्रेमी शांत बसले असेल तरी या विषयात उठलेले संशयाचे वादळ शांत होणार का हे प्रकरण आणखी काय वेगळे वळण घेणार हे पहावे लागणार आहे.

आतापर्यंत वृक्ष प्राधिकरण विभाग वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाकडून संबंधित सोसायटीला देण्यात आलेल्या परवानग्यांचा तपशील खालीलप्रमाणे

  • 9 सप्टेंबर 2020 – बुच 4, निलगिरी 1, अशोक 4, गुलमोहोर 1

  • 26 मे 2022 – सुबाभूळ 1, सुबाभूळ 3

  • 6 ऑक्टोंबर 2022 – रबर 1, उंबर 1, बुच 1, जॅकरंडा 1, चेरी 1, सुरू 1, निलगिरी 1

  • 28ऑक्टोंबर 2022 – निलगिरी 1, रेनद्री 1, गुलमोहोर 1, सुबाभूळ 5

  • 14फेब्रुवारी 2023 – जॅकरंडा 1, चेरी 1, सुरू 1, निलगिरी 1
Img 20221126 wa02126927299965323449855 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये