गणेशोत्सव मंडळांच्या विविध प्रलंबित विषयांबाबत 8 ऑगस्टला बैठक

पुणे : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विविध प्रलंबित विषयांबाबत सोमवारी महापालिका,पोलीस आणि गणेशोत्सव मंडळ प्रतिनिधींची बैठक आयोजित केली आहे. ही बैठक महापालिकेच्या मुख्य इमारतीतील जुन्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सोमवारी 8 ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे.
महापालिकेकडून गणेशोत्सवानिमित्त १२ जुलै रोजी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक बैठक झाली होती. शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दरवर्षी मांडवासह विविध गोष्टींसाठी परवाने घ्यावे लागतात. मंडळांच्या मांडवाची जागा व अन्य गोष्टी वर्षानुवर्ष कायम असतात. त्यामुळे मंडळांच्या जय गणेश व्यासपीठातर्फे दरवर्षीऐवजी एकदम पाच वर्षांचे परवाने दिले जावेत, अशी मागणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी पुणे दौऱ्यादरम्यान गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. या वेळी शिंदे यांनी सार्वजनिक मंडळांना एकदाच पाच वर्षांचा परवाना देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. त्याचबरोबर शेवटच्या पाच दिवसात रात्री बारापर्यंत स्पीकर सुरू ठेवण्यास मान्यता दिली. या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे.



