“:…म्हणून कसबा पोटनिवडणुकीत भाजपचं ओबीसी समीकरण”, रोहित पवारांचं वक्तव्य

पुणे : सध्या राज्यभर कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रात एखाद्या आमदाराचं निधन झालं तर त्यांच्या मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत संबंधित आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनाच उमेदवारी देण्याची परंपरा आहे. त्यानुसार चिंचवडच्या पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली. परंतु कसबा पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला भाजपने उमेदवारी दिली नाही. त्यानंतर ब्राह्मण संघटनांनी यावर नाराजी व्यक्त केली. आता आमदार रोहित पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
पुण्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले की, “उपमुख्यमंत्री देवेंद्र फंडणवीस यांनी आणि मी टिळक वाड्यात जाऊन शैलेंद्र टिळक आणि कुणाल टिळक यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर आम्ही उमेदवारीबाबत निर्णय घेतला. टिळकांच्या घरात महाविकास आघाडीने उमेदवारी दिली तर ही निवडणूक आम्ही बिनविरोध करू.” याबद्दल माध्यमांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना विचारले असता, रोहित पवार म्हणाले की, “चंद्रकांत दादाचं हे विधान हास्यास्पद आहे.”
रोहित पवार म्हणाले की, स्वतः चंद्रकांत पाटील यांनी टिळक कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देण्याची मागणी केली होती. परंतु भारतीय जनता पक्षाने टिळक कुटुंबाविरोधात उमेदवार दिला आहे. काही तज्ज्ञांनी असं मत व्यक्त केलं आहे की, भारतीय जनता पक्षाने त्यांच्या पक्षातील ओबीसी नेत्यांची ताकद कमी केली होती. त्यामुळे आता त्यांना आणि मतदारांना खूश करण्यासाठी भाजपने टिळक कुटुंबाला डावलून ओबीसी उमेदवाराला संधी दिली आहे. परंतु टिळक कुटुंबियांना संधी देण्याची जबाबदारी भाजपची आहे.




