कष्टकरी ज्येष्ठ महिलांच्या हस्ते व्यावसायिक फलकाचे उद्घाटन ; तरुण वकिलाचा नवीन पायंडा

पुणे : कर्वेनगर परिसरात राहणारे तरुण वकील ॲड. बाळकृष्ण निढाळकर यांनी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर आपला वकिली व्यवसाय सुरू करत असताना तयार केलेल्या नामफलकाचे उद्घाटन कष्टकरी ज्येष्ठ महिलांच्या हस्ते करून नवीन आदर्शवत पायंडा पाडला आहे.
ॲड.बाळकृष्ण निढाळकर हे ॲड. असीम सरोदे यांच्याकडे वकिलीची प्रॅक्टीस करतात. निढाळकर यांनी ॲड. असीम सरोदे अँड असोसिएटस या नावाने व्यवसाय सुरू केला आहे. कर्वेनगर चौकात गेली ३० वर्षे भाजी विक्री करणाऱ्या गंगू मावशी व याच चौकात ३५ ते ४० वर्ष चप्पल शिवण्याचे काम करत असलेल्या सोनावणे आजी या दोन कष्टकरी महिलांच्या हस्ते व्यावसायिक फलकाचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या हस्ते उद्घाटन झाल्याने दोघीही भारावून गेल्या होत्या.
निढाळकर यांनी सांगितले की, समाजातील कष्टकरी वर्गासाठी काम करण्याची इच्छा पूर्वीपासून आहे. आता या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांच्या न्याय हक्कासाठी काम करणार आहे. या दोन्ही कष्टकरी आजींना मी लहानपणापासून या चौकात पाहत आलो आहे. न थकता कष्ट करणाऱ्या या आजी पाहिल्या की त्यांचा अभिमान वाटतो आणि म्हणूनच त्यांच्या हस्ते हा उद्घाटनाचा कार्यक्रम करण्यात आला.




