वारजे डुक्कर खिंड ते तिरुपतीनगर रस्त्याची अधिकाऱ्यांकडून पाहणी ; प्रत्यक्ष जागेवर बाधित जागा मालकांशी चर्चा…आणि
पुणे : वारजे डुक्कर खिंड ते तिरुपतीनगर या 24 मीटर रुंद डीपी रस्त्याच्या कामाची आज महापालिका अधिकाऱ्यांनी पाहणी केली. रस्त्यात बाधित होत असलेल्या जागा मालकांशी प्रत्यक्ष जागेवर अधिकाऱ्यांनी संवाद साधत त्यांच्याशी सकारात्मक चर्चा केली.
कात्रज देहूरोड बाह्यवळण महामार्गावरून कर्वेनगर व पुढे कोथरूड एरंडवणा भागात जाण्यासाठी तसेच वारजे सर्व्हिस रस्त्याला पर्यायी मार्ग ठरू शकणाऱ्या वारजे डुक्कर खिंड ते तिरुपतीनगर या 24 मीटर रुंद डीपी रस्त्याचे काम पूर्ण व्हावे यासाठी माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ व माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांच्याकडून पाठपुरावा केला जात आहे. मागच्या आठवड्यात महापालिकेत पालिका अधिकारी, रस्त्यात बाधीत होणारे जागा मालक, बाबा धुमाळ यांच्यात बैठक झाली होती. त्यावेळी प्रत्यक्ष पाहणीचे नियोजन करण्यात आले होते त्यानुसार आजचा पाहणी दौरा पार पडला.
यावेळी पथ विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजीत डोंबे, भास्कर हांडे, भू संपादन विभागाचे राजेंद्र थोरात, अभिषेक घोरपडे, माजी नगरसेवक बाबा धुमाळ, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी प्रत्यक्ष रस्त्यात बाधित होणाऱ्या जागांची पाहणी केली. यावेळी जागामालक ही उपस्थित होते. या प्रसंगी जागा मालकांना कशा स्वरूपात मोबदला दिला जाणार याबाबत चर्चा झाली असून बाधित जागा मालकांनी आपल्या जागेच्या कागदपत्रांची फाईल महापालिकेत पुढील प्रक्रियेसाठी जमा कराव्यात असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. तसेच जागा मालकांना योग्य प्रकारे मोबदला देऊन रस्त्याचे काम सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.
बाबा धुमाळ म्हणाले, अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन रस्त्यात बाधित होत असलेल्या जागा मालकांशी चर्चा केली आहे. जागा मालकांना तातडीने मोबदला देऊन पालिकेने रस्त्याचे काम पूर्ण करून घ्यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास वारजे हायवे सर्व्हिस रस्त्याला रोज होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वारजे व कर्वेनगर मधील नागरिकांची सुटका होणार आहे. आज सकारात्मक चर्चा झाली असून या रस्त्याचा प्रश्न लवकर मार्गी लागेल.