कोथरूडमधील भुजबळ टाऊनशिप परिसरातील पाणी प्रश्न सुटणार ; नवीन जलवाहिनीच्या कामाचा शुभारंभ..
चौथ्यांदा निवडून आल्याबद्दल भीमराव तापकीर यांचा नागरिकांकडून सत्कार
कोथरूड : एकलव्य काॅलेज येथील भुजबळ टाऊनशिप परिसरातील पाण्याचा प्रश्न आता सुटणार असून माजी नगरसेविका अल्पना गणेश वरपे यांच्या प्रयत्नातून मान्य झालेल्या ६ इंच व्यासाच्या पिण्याच्या पाण्याची लाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार भिमराव तापकीर यांच्या हस्ते पार पडला.
गेल्या अनेक महिन्यांपासून भुजबळ टाऊनशिपला पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावत होता त्यामुळे या परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. येथील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी माजी नगरसेविका अल्पना वरपे यांच्याकडून महापालिकेच्या संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराव्याला यश आले असून नवीन जल वाहिनी टाकण्याचा कामाचा शुभारंभ करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून त्यांनी अल्पना वरपे व गणेश वरपे यांचे आभार मानले आहेत.
दहा दिवसात नवीन जलवाहिनीचे काम पूर्ण करावे व नियमित पाणीपुरवठा सुरू करावा अशा सूचना आमदार भीमराव तापकीर यांनी यावेळी पाणीपुरवठा विभागातील अधिकार्यांना दिल्या. हे काम झाल्याने नागरीकांनी विशेषतः महिला वर्गाने या कामाबद्दल आभार व्यक्त केले आहेत. यावेळी नवनिर्वाचित आमदार भीमराव तापकीर यांचा चौथ्यांदा निवडून आल्याबद्दल नागरिकांकडून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, भुजबळ टाऊनशिप परिसरातील नागरिक, प्रबोधन मंच व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.