सलग १६ वर्ष २६/११ मधील शहीदांना रक्तदानातून श्रद्धांजली…कोथरूड मध्ये राबवला जातो हृदयस्पर्शी उपक्रम
कोथरुड : २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले वीर पोलीस अधिकारी, सैनिक व नागरीक यांना सलग १६ व्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करून श्रद्धांजली वाहण्यात आली. या भ्याड हल्ल्यानंतर सलग १६ वर्षे उमेश भेलके हे शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करत आहेत. दरवर्षी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या दिवशी सायंकाळी सर्वजण एकत्र येत मेणबत्या प्रज्वलित करत शहिदांना अभिवादन करत असतात. यावेळी सुरू असलेल्या देश भक्तीपर गीतांनी हा उपक्रम हृदयस्पर्शी ठरतो.
यावर्षी रक्तदान शिबिरात २०० जणांनी रक्तदान करत शहिदांना श्रद्धांजली वाहिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कोथरुड विभाग, स्व,उत्तमकाका भेलके प्रतिष्ठान, संयुक्त भेलकेनगर मित्र मंडळ, एकदंत वाद्य पथक यांच्या वतीने या शिबिराचे संयोजन करण्यात आले होते. पूना ब्लड बँक च्या सहकार्याने हे शिबिर घेण्यात आले.
उमेश भेलके म्हणाले, सलग १६ वर्षे आम्ही २६/११ हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रक्तदान शिबिर घेत आहोत. या शिबिरात दरवर्षी न चुकता शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काही तरुण रक्तदान करण्यासाठी येत असतात तर काही नव्याने समाविष्ट होत असतात. काही जणांनी तर सलग १६ वर्षे या शिबिरात रक्तदान करून आपले कर्तव्य बजावले आहे. या शिबिरात रक्तदान करून खऱ्या अर्थाने देशासाठी, सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी आपण काहीतरी केले याचे समाधान भेटते अशा भावना रक्तदाते व्यक्त करत असतात.