‘जम्बो’ पुन्हा रुग्णसेवेत; आठवडाभरात ५०० बेड्स उपलब्ध करणार – महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे : पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महानगरपालिका म्हणून या परिस्थितीचा विचार करता शहरातील आरोग्य यंत्रणा आणखीन क्षमतेने उभी करण्याकडे कल असून शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सेंटरमधील बेड्स संख्या येत्या आठवडाभरात ५०० पर्यंत नेण्यात येणार आहे. आज तातडीने प्राथमिक स्वरूपात ५५ बेड्स उपलब्ध करण्यात आले आहेत. अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.Jumbo’ again in patient care; Will provide 500 beds in a week – Mayor Muralidhar Mohol
मोहोळ यांनी जम्बो रुग्णसेवेसाठी सुरु करण्यापूर्वी आयुक्त विक्रम कुमार आणि अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासमवेत आढावा घेतला. मोहोळ म्हणाले,गेल्या वर्षभरात कोरोनाचा संसर्ग वाढता लक्षात घेता आठशे बेडसचे जम्बो कोविड उभारले होते, १५ जानेवारी २०२१ रोजी कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने कोविड सेंटर बंद करण्यात आले होते, पण जर शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला तर कमी वेळेत कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेत सर्व व्यवस्था तयार ठेवली होती.

प्राथमिक स्वरुपात तातडीने जवळपास ५५ बेड्स सुरू करण्यात आले आहेत, त्यामध्ये २५ ऑक्सिजन बेड, २५ सीसीसी बेड व ५ आयसीयू बेड सुरू करण्यात आले आहेत. तसेच येत्या आठवडाभरात एकूण ५०० बेडस निर्माण केले जाणार आहेत. यामध्ये २५० ऑक्सिजन बेड, २०० सीसीसी बेड व ५० आयसीयू बेड असणार आहेत. यामधील येत्या बुधवारी (२४ मार्च) १०० ऑक्सिजन बेड, ७५ सीसीसी बेड व २० आयसीयू बेड निर्माण होणार आहेत, तर शुक्रवारी (२५ मार्च) १२५ ऑक्सिजन बेड, १०० सीसीसी बेड व २५ आयसीयू बेडस निर्माण केले जाणार आहेत.
कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे, पुणेकरांनी काळजी घेतली पाहिजे तसेच सूचना व नियमांचे तंतोतंत पालन करण्याची गरज आहे. जम्बो कोविड सेंटर त्यावेळी कायमचे बंद न करण्याचा निर्णय योग्यच होता, हे आज सिद्ध झाले. असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.



