बालेवाडीमधील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल पूर्ण ताब्यात घेऊन जम्बो कोविड सेंटर सुरू करावे – चंद्रकांत मोकाटे

पुणे : पुणे शहरातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला असता, काही महत्वाच्या गोष्टींची गरज लक्षात घेऊन रुग्ण संख्या वाढत असल्याने शहरात तातडीने बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल पूर्ण ताब्यात घेऊन जम्बो कोविड सेंटर सुरु करावे. अशी मागणी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी केलेल्या मागण्या
१. पुणे महानगरपालिकेचे स्व.बिंदूमाधव बाळासाहेब ठाकरे रुग्णालय १२ हजार स्के. फुटाचे आहे. सध्या रूग्णालयामध्ये फक्त ओपीडी सुरु असून, पुणे मनपा आयुक्त व आरोग्य प्रमुख यांच्याकडे शिवसेनेच्या वतीने उर्वरित जागेत कोविड सेंटर सुरु करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी २०० बेड्सचे रुग्णालय सुरु होऊ शकते.
२. आज रोजी बालेवाडी येथील कोविड सेंटर बंद आहे. हे कोविड सेंटर ७५० ते ८०० बेडचे होते. बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल पूर्ण ताब्यात घेऊन जम्बो कोविड सेंटर सुरु केल्यास हजारो नागरिकांना त्याचा लाभ होऊ शकतो.
३. पुणे शहरातील बहुतांश नागरिक चाळींमध्ये छोट्या खोल्यांत राहतात. ३५ % लोक झोपडपट्टीत राहतात. तिथे घरात एक रुग्ण पॉझिटिव्ह झाला तर कुटुंबातील इतर जणांना वेगवेगळे राहण्याची सोय नसल्यामुळे कुटुंबातील इतर जण पॉझिटिव्ह होऊन रुग्णांची वाढ मोठ्याप्रमाणात होते. या करिता पुणे शहरातील/जिल्ह्यातील पुणे विद्यापीठ हॉस्टेल,, सी.ओई.पी हॉस्टेल, एस.एस.पी.एम.एस. हॉस्टेल, भारती विद्यापीठ हॉस्टेल, सिंहगड कॉलेज हॉस्टेल, एम.आय.टी. कॉलेज हॉस्टेल, सिम्बॉयसिस कॉलेज हॉस्टेल, महर्षी कर्वे संस्थाचे हॉस्टेल, एस.पी.कॉलेज, गरवारे कॉलेज, एफ.सी.कॉलेज, वाडिया कॉलेज, व इतर नामांकित शिक्षण संस्थांचे हॉस्टेल ताब्यात घेऊन सदर ठिकाणी क्वारंटाइन सेंटर व कोविड रुग्णालय सुरु केल्यास नागरिकांची होणारी ससेहोपालट थांबेल व कोरोनाचा प्रसार थांबण्यास मदत होईल.
४. रेमडीसिवर इंजेक्शन पुण्यात शिवसेनेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना फायदा होईल.
५. कोथरूड शिवसेनेच्या वतीने रोज साधारण १०० ते १५० नागरिकांचे पुणे मनपाच्या आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरण करण्यात येत आहे, तसेच रुग्णांना प्लाझ्मा, औषधोपचार, रुग्णालयात बेड उपलब्ध करून देण्यासाठी मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे.
६. कोथरूड शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ५२३ रक्तदात्यांनी सहभाग घेत रक्तदान केले.




