महापालिकेने पुलावरती व नदी काठी निर्माल्य कलश ठेवावेत

भाजपा शिवाजीनगर व्यापारी आघाडीची मागणी
पुणे : नागरिकांनी आपला निर्माल्याचा कचरा नदी पात्रात टाकू नये म्हणुन महापालिकेने पुलांवरती जाळ्या बसवल्या आहेत. परंतु आता नागरिक जाळ्यांमुळे निर्माल्य नदीत टाकता येत नसल्याने ते तसेच पुलावरतीच टाकून जात असल्याचे दिसत आहे. यामुळे पुलांच्या सौंदर्याला बाधा येण्याबरोबरच दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे महापालिकेकडून पूलांवरती व नदीकाठी निर्माल्य कलश कायमस्वरूपी ठेवण्यात यावेत अशी मागणी भाजपा शिवाजीनगर व्यापारी आघाडी कडून करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन भाजपा व्यापारी आघाडी शिवाजीनगर मतदार संघ अध्यक्ष विकास डाबी व सरचिटणीस संतोष काळे यांच्याकडून महापौर मुरलीधर मोहोळ यांना देण्यात आले आहे. यावेळी भाजपा पुणे शहर व्यापारी आघाडी अध्यक्ष महेंद्र व्यास, उपाध्याक्ष योगेश बाचल , शिवाजीनगर सोशल मिडीया अध्यक्ष निलेश धोत्रे, लक्ष्मण नलावडे, संपर्क प्रमुख किरण ओरसे आदी उपस्थित होते.

गेली अनेक वर्ष पुणे महानगरपालिकेच्या वतीने मुळा मुठा नदी काठी व पुलांवरती निर्माल्य कलश ठेवण्यात येत होते. आता पुलावरून नदीत निर्माल्य टाकू नये याकरिता पुलावरती जाळ्यांचे कंपाऊंड लावण्यात आले आहे. त्यामुळे आता निर्माल्य नदीत टाकता येत नसल्याने नागरिक कोणताही विचार न करता आपले आणलेले निर्माल्य नदीकाठी किंवा पुलावर मोठ्या प्रमाणात टाकून जात आहेत. त्याचा त्रास येणाऱ्या जाणाऱ्या पादचाऱ्यांना व वाहनचालकांना सहन करावा लागत असल्याने निर्माल्य कलश ठेवण्याची मागणी केल्याचे विकास डाबी यांनी सांगितले.









