बीडीपीच्या जागेत पुणे मेट्रोचा राडारोडा : राष्ट्रीय हरित लवादाने दिले हे आदेश

पुणे : कोथरूड मधील चांदणी चौक येथील जैवविविधता (BDP)आरक्षण असलेल्या भागात पुणे मेट्रो आणि काही बांधकाम व्यावसायिक बेकायदेशीरपणे कचरा आणि बांधकामाचा राडारोडा टाकून पर्यावरणास हानी पोहोचवत असल्याचे निदर्शनास आले असून राष्ट्रीय हरित लवादाने याप्रकरणी सुनावणी दरम्यान ६ आठवड्यात समिती बनवून अहवाल तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
पर्यावरण वादी कार्यकर्ता राकेश धोत्रे यांनी पर्यावरण रक्षणाच्या हेतूने राष्ट्रीय हरित लवादा कडे या संदर्भात सुप्रीम कोर्टातील वकील ब्रजेश कुमार यांचे मार्फत याचिका दाखल केली आहे. राष्ट्रीय हरित लवादाने याची गंभीर दखल घेतली असून दिनांक ६/१०/२०२० रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान पुढील ६ आठवड्यात एक नवीन कमिटी बनवून या विषयात सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

धोत्रे म्हणाले, मेहेरबान कोर्टाचे खूप खूप आभार. या मध्ये दोषींवर कडक कारवाई होणार हे निश्चित आहेच, तशी मागणी आम्ही मेहेरबान कोर्टाकडे केली आहे, जेणे करून पुन्हा कोणतीही खाजगी किंवा शासकीय यंत्रणा पर्यावरण कायद्याचे उल्लंघन करण्याचे धाडस करणार नाहीत. या संदर्भात याचिका कर्ता म्हणून मला ज्या आदेशाचे पालन करावयाचे ते मी करणार आहेच.
यापूर्वी देखील पुणे मेट्रो ने संबंधित कामाचा राडारोडा चांदणी चौक परिसरात टाकल्या प्रकरणी महापालिकेकडून पुणे मेट्रोला नोटीस देण्यात आली होती. मात्र पुढे कोणतीही कारवाई झाली नाही.



