विद्यार्थ्यांना मानव बिबट सहजीवन, शून्य सर्पदंश जनजागृतीचे धडे

नाशिक पुर्व वनविभाग व वन्यजीव संरक्षण संस्थेचा पुढाकार
ओझर : पिंपळगाव बसवंत येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मवीर गणपतदादा मोरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मानव बिबट सहजीवन जनजागृती व शुन्य सर्पदंश जनजागृती अभियानाद्वारे सखोल माहिती मिळावी यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पावसाळा सुरु झाल्यानंतर शेतीची कामे लगबगीने सुरु होतात. साप दिसण्याचे प्रमाण वाढते आणि सर्पदंशाच्या घटना देखील वाढतात. यावर विद्यार्थ्यांना व नागरिकांना माहिती मिळावी या उद्देशाने नाशिक पुर्व वनविभागातील मनमाड उपविभागाचे प्रभारी सहायक वन संरक्षक अक्षय म्हेत्रे, चांदवड वनपरीक्षेत्र अधिकारी एस. बी. वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्थेच्या निफाड शाखेच्या वतीने पिंपळगाव येथील मोरे विद्यालयात मानव बिबट सहजीवन व शून्य सर्पदंश जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी वनपरिमंडळ अधिकारी देविदास चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मानवाने वन्यप्राण्यांसोबत संघर्ष न करता त्यांच्या सोबत सहजीवन करून राहिले तर मानवाचे पृथ्वीवर अस्तिव टिकून राहील अन्यथा या पृथ्वीवरून मधमाशी जरी नष्ट झाली तरीही माणूस पृथ्वीवर दिसणार नाही, अशी स्पष्ट संकल्पना मांडत मानवाच्या जीवनातील प्राण्यांच्या अन्न साखळीचे महत्व विषद करणारी कविता सादर केली. विविध प्राण्यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. बिबट प्राणी व शून्य सर्पदंश जनजागृती अभियान व वन्य प्राणी संरक्षण, संवर्धन आणि संशोधन या विषयावर व्याख्यान व प्रात्यक्षिक घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्थेचे निफाड शाखा अध्यक्ष व सर्पअभ्यासक सुशांत रणशूर यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना वन्यप्राणी यामध्ये प्रामुख्याने भारतातील साप, सापांचे प्रकार, बिनविषारी साप, या प्राण्यांच्या जीवनाविषयी त्याचप्रमाणे त्यांच्या विविध प्रकारच्या जाती तसेच सर्पदंश झाल्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत याचं सखोल मार्गदर्शन केले.



प्राचार्य पी. के. धुळे यांनी विद्यार्थ्यांना मिळालेली माहिती अत्यंत मौलिक असून आमचे विद्यार्थी या माहितीचा अवलंब करून त्यांच्या पालकांनाही याबद्दल अवगत करतील अशी ग्वाही देत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन म्हणून वन विभागाच्या कार्याबद्दल माहिती देण्यासाठी वेळ देण्याची विनंती वनाधिकारी चौधरी यांना केली. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या माहितीचा उपयोग करून इतरांना संकटात मदत करू. प्रथमोपचार करून एखाद्या रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची खात्री व्यक्त केली. यावेळी पिंपळगाव वनरक्षक विजय टेकणार, वनसेवक वसंत देवरे, वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्थेचे निफाड शाखा सदस्य श्रीकांत फड, विद्यालयाचे प्राचार्य पी. के. धुळे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









