काँग्रेसचा राज ठाकरेंना टोला; म्हणे, “भाजपने सुरुवातीला हवा भरली, पण…!”

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अयोध्या दौरा स्थगित केल्यावर कॉंग्रेसने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. सचिन सावंत यांनी राज ठाकरेंची आणि मनसेची भाजपनं कुचंबणा केल्याचं म्हटलं आहे.
“राज ठाकरे यांच्या या नामुष्कीला भाजपच जबाबदार आहे. सुरुवातीला हवा भरण्याचे काम भाजपनेच केले. पण हिंदुत्व व्होट बँकेत वाटेकरी नको असल्यानेच औरंगाबाद सभेआधीच विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने काढता पाय घेतला. उत्तर भारतीय मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी जाणीवपूर्वक मनसेची कुचंबणा केली”, असं सचिन सावंत म्हणाले आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरेंवर खोचक शब्दांत निशाणा साधला. “भाजपने त्यांच्या बाबतीत असं का करावं. हे चुकीचं आहे. प्रत्येक वेळी भाजप असा खेळ करतं आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांना त्यांच्या राजकीय फायद्यासाठी वापरून घेतं. त्यातलाच हा प्रकार मला दिसतोय. यातून एक शहाणपण काही लोकांना आलं, तर बरं होईल. यात नुकसान महाराष्ट्राच्या नेतृत्वाचं, महाराष्ट्राचं होतं. आपण भाजपच्या हातात वापरले जातोय हे काही लोकांना उशीरा समजतं”, असं राऊत म्हणाले आहेत.







