पुणे शहर

अंशदायी योजनेचे पैसे न दिल्याने खाजगी रुग्णालयात पालिका कर्मचाऱ्यांना उपचार मिळेनात : धुमाळ

तातडीने उपाययोजना करण्याची विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांची मागणी

पुणे: पुणे महानगरपालिका, शिक्षण मंडळ व पीएमपीएमएलचे अधिकारी व कर्मचारी पालिकेच्या अंशदायी वैद्यकीय योजनेअंतर्गत खाजगी रुग्णालयात उपचार घेत असतात. त्यांच्यावर उपचारासाठी झालेला खर्च महापालिकेकडून रुग्णालयांना दिला जातो. पण सध्या पालिकेकडून रूग्णालयांना या योजनेची वेळेवर बिले दिली जात नसल्याने रुग्णालये कर्मचाऱ्यांना दाखल करून घेत नसल्याने कर्मचाऱ्यांपुढे मोठ्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे पालिकेने तातडीने रुग्णालयांची बिले अदा करून कर्मचाऱ्यांना या समस्येतून सोडवावे अशी मागणी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे.

या संदर्भातील निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांना दिले असून याबाबतीत उपाययोजना नाही झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
 
धुमाळ यांनी म्हंटले आहे. पालिकेने बिले अदा न केल्याने खाजगी रुग्णालयांकडून मनपा कर्मचारी यांना दाखल करून घेतले जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशा वेळी मनपा व पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची धावपळ होत असून त्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.  पीएमपीएमएलकडून अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेसाठी मनपास दरमहा १ कोटी इतकी रक्कम वर्ग केली जाते. परंतू लॉकडाऊनमुळे पीएमपीएमएलचे उत्पन्न घटले असल्याने आर्थिक स्थिती पाहता दवाखान्यांची बिले अदा करणेची रक्कम दिली गेली नाही, असे समजते.

पीएमपीएमएलचे कर्मचारी लॉकडाऊनमध्ये व सद्यस्थितीत कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना अंतर्गत काम करीत आहे व त्यांची काम करणेची तयारी देखील आहे. असे असताना कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची पूर्ण जबाबदारी पुणे महापालिकेची आहे. रुग्णालयांना रक्कम आपणास देणे हे कायद्याने बंधनकारक आहे. आज ना उद्या ही रक्कम आपणास दयावयाची आहेच पण जर रुग्णालयांना वेळीच रक्कम दिल्यास पुणे महानगरपालिका, शिक्षण मंडळ व पीएमपीएमएलचे अधिकारी व कर्मचारी यांचे उपचारा संदर्भात होणारे हाल थांबणार आहेत.

रूणालयांना वेळीच बिले अदा का केली जात नाहीत असा सवाल उपस्थित करत धुमाळ यांनी याबाबत जबाबदार अधिकारी कर्तव्यात कसूर करत आहेत का ? याबाबत चौकशी करून आम्हास लेखी कळवावे अशी मागणी केली आहे.  

अशाच प्रकारे पूर्वी शहरी गरीब योजनेची देखील बिले न दिल्याने गोरगरीबांना उपचार घेताना त्रास झाला, त्यावेळी संबंधितांना आदेश देवूनही आता महापालिका कर्मचाऱ्यांबाबतीत पुन्हा तसाच प्रकार घडणे खेदजनक आहे. सध्या महामारीच्या काळात ज्या संस्थेचे कर्मचारी अहोरात्र जीवाची पर्वा न करता काम करतात अशा कर्मचाऱ्यांना स्वतःवर उपचारासाठी खाजगी रूग्णालये दाखल करून घेत नाहीत , ही बाब अत्यंत दुर्देवी असल्याचे धुमाळ यांनी म्हंटले आहे. याबाबतीत लवकर निर्णय नाही घेतल्यास आंदोलन करणार असल्याचे त्यांनी  सांगितले आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये