‘मराठा आरक्षणाची खाज’ वक्तव्यावरुन वाद पेटल्यानंतर तानाजी सावंतांनी मागितली माफी

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून माफी मागितली आहे. तानाजी सावंत यांच्या वक्तव्यामुळे मराठा समाजात रोष निर्माण होत असून, सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा या मराठा संघटनांनी सरकारने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली होती.
तानाजी सावंतांचे काय स्पष्टीकरण
“मी माझं वक्तव्य नाकारत नाही, बोलण्याच्या ओघात झालं असावं. पण तुम्ही फक्त तेवढाच भाग काढून पाहू नका असं माझं जाहीर आवाहन आहे. माझं एक तासांचं भाषण आहे. मराठा क्रांती मोर्चाचे सहकारी माझ्यासोबत उपस्थित होते,” असं तानाजी सावंत यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले “सत्तांतर झाल्यानंतर सहा महिन्यात आरक्षण रद्द झालं हे सर्वांनीच पाहिलं. त्या दिवसापासून सध्याचं सत्तांतर होईपर्यंत कोणीही मोर्चा काढला नाही, भाष्य केलं नाही. असं असतानाही आम्ही मराठा आरक्षणावर चर्चा करत होतो. पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री खुर्चीवर बसेपर्यंत आंदोलनाची भाषा सुरु केली. आम्हाला यामधून, त्यामधून आरक्षण हवं वगैरे अशा मागण्या होत आहेत. पण आपण टिकाऊ आरक्षण मिळवू असं माझं म्हणणं आहे आणि ते मी मिळवणारच. आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशीच माझी घोषणा आहे”.

“जे विरोधात बोलत आहेत त्यांना तानाजी सावंत आणि त्यांचे सहकारी आरक्षणासाठी काय करत आहेत याची माहिती नाही. तगादा लावलाच पाहिजे, पण थोडा वेळ द्या. आम्ही संबंधित नेत्यांशी चर्चा करत आहोत,” अशी माहिती तानाजी सावंत यांनी दिली.खाज सुटली शब्दावरुन आक्षेप घेतला जात असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले “तो शब्द मी मागे घेतो. दिलगिरी व्यक्त करत मी माफी मागतो. ज्या समाजात मी वाढलो तिथल्या पाळण्यातल्या मुलापासून ते आजोबापर्यंत सर्वांची माफी मागण्यास काही अडचण नाही. माझा समाज मला माफ करेल. मी त्याचा एक भाग आणि घटक आहे”. हे वाक्य मराठा समाज आणि झगडणाऱ्यांसाठी हे वाक्य नव्हतं असाही दावा त्यांनी केला.
काय म्हणाले होते तानाजी सावंत






उस्मानाबादमध्ये हिंदूगर्वगर्जना संवाद यात्रेदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात तानाजी सावंत यांनी भाषण केलं. यावेळी ते म्हणाले होते की, “मराठा आरक्षण गेल्यानंतर दोन वर्ष तुम्ही गप्प होता आणि आता सत्तांतर झाल्यानंतर तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली. मात्र, आता पुढील दोन वर्षांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे टिकाऊ आरक्षण मिळवून देतील”.