वारजे माळवाडीतील पाणी प्रश्नासंदर्भात अधिकाऱ्यांबरोबर बैठक ; अधिकाऱ्यांचे उपाययोजना करण्याचे आश्वासन

दिपाली धुमाळ यांची सोसायट्यांमधील पदाधिकाऱ्यांना घेऊन अधिकाऱ्यांबरोबर पाणी प्रश्नावर चर्चा
वारजे : वारजे माळवाडी परिसरात सध्या वारंवार पाणी प्रश्न निर्माण होत आहे. पाणीपुरवठा ज्या दिवशी दुरुस्तीसाठी बंद ठेऊन नंतर सुरू केला जातो त्यानंतर पुढील दोन ते तीन दिवस पाणीच येत नसल्याने नागरिकांची तारांबळ होत आहे. त्यामुळे निर्माण होत असलेल्या या पाणी प्रश्नासंदर्भात माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी सोसायट्यांमधील पदाधिकाऱ्यांसमवेत महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेत यावर चर्चा करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
दिपाली धुमाळ व बाबा धुमाळ यांनी वारजेतील सोसायट्यांमधील पदाधिकाऱ्यांसमवेत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त बिनवडे यांची भेट घेतली. यावेळी पाणी पुरवठा विभागाचे प्रसन्न जोशी, झोनचे अधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी झालेल्या बैठकीत सोसायट्यांमधील पदाधिकाऱ्यांनी आपले म्हणणे मांडत पाणी प्रश्न सोडवण्यासाठी योग्य ते नियोजन करण्याची मागणी केली.
मागील काही महिन्यांमध्ये दुरुस्तीच्या कामासाठी वारंवार पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येतो परंतु हा पाणीपुरवठा पुन्हा सुरू केल्यानंतर पुढील दोन ते तीन दिवस काही सोसायट्यांना पाणीच येत नाही तर काहींना अतिशय कमी वेळ कमी दाबाने पाणीपुरवठा होतो, त्यामुळे पाणीटंचाई निर्माण होत असून नागरिकांमध्ये संताप असल्याची बाब दिपाली धुमाळ यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.
यावर बिनवडे यांनी पुढील काळात कमीत कमी क्लोजर म्हणजेच पाणीपुरवठा बंद न ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल किंवा पाणीपुरवठा बंद ठेवलाच गेला तर तो सुरळीत होईपर्यंत सोसायट्यांना आवश्यक तेवढे पाणी टँकरने पुरवले जाईल असे आश्वासन दिले. ही समस्या जास्त दिवस राहणार नसून पुढील पंधरा दिवसात एल अँड टी ची पाईपलाईन ॲक्टिव्ह केली जाणार आहे त्यानंतर अडचण येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

एल अँड टी कंपनीने पाईपलाईन टाकताना तसेच मीटर बसवता अनेक ठिकाणी नुकसान केले असून त्याची दुरुस्ती ही करण्यात आलेली नाही तसेच मीटर बसवलेल्या ठिकाणी नोटीसा दिल्या जात असल्याचा मुद्दा चर्चेला घेण्यात आला. त्यावर बिनवडे यांनी देण्यात आलेल्या नोटिसांबाबत नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट केले, तसेच याबाबत अभ्यास सुरू असून पाण्याचा वापर किती प्रमाणात केला जात आहे हे पाहिले जात आहे. घरटी लोकांचा केलेला सर्वे चुकला असून त्यावर काम सुरू आहे. प्रति माणसी १५० लिटर पाणी देण्याची जबाबदारी पालिकेची असून तसे नियोजन केले जात असल्याचे सांगितले.
या बैठकीनंतर धुमाळ यांनी सांगितले की पाणी प्रश्ना संदर्भातील मुद्दे अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आले असून त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. हा प्रश्न सुटेपर्यंत आपण अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार असून वेळ प्रसंगी आंदोलनाची तयारी ठेवली आहे.



