पुण्यात जड वाहनांना बंदी असलेल्या रस्त्यांवर नियमांचे काटेकोर पालन करण्याची खासदार मेधा कुलकर्णी यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी
पुणे : पुणे शहरात दिवसा जड वाहनांना बंदी असलेल्या रस्त्यांवर नियमांचे काटेकोर पालन करण्याची आग्रही मागणी खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे.
खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या,शहराच्या विविध महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत असताना त्यातील एक उपाययोजना म्हणून बाहेरून येणाऱ्या जड वाहनांना, मालवाहतुकीच्या ट्रकला शहराच्या मुख्य रस्त्यांवर दिवसा येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. परंतु शहराच्या विविध ठिकाणी सर्रास ही वाहने फिरताना दिसतात.
आज गंगाधाम चौकात झालेला अपघात हा अशाच प्रकारच्या प्रतिबंध असलेल्या रस्त्यावर डंपरच्या धडकेमुळे झाला आणि एका भगिनीला आपला जीव गमवावा लागला. अक्षरशः काही कळायच्या आत या भगिनीचे डोके धडावेगळे झाले. इतका भयानक हा अपघात होता. या रस्त्यावर बांधकामाच्या अनेक साइट्स चालू असून येथे दिवसा जड वाहने येत असतात.
सदर अपघाताच्या संदर्भात वाहन चालकाला शिक्षा करण्याबरोबरच वाहतूक पोलीस अधिकारी यांनाही जबाबदार धरून नियमांचे काटेकोर पालन न केल्याबद्दल तसेच बेजबाबदार वर्तनाबद्दल त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी आणि त्यांना कार्यमुक्त करावे अशा प्रकारची मागणी कुलकर्णी यांनी केली आहे.