वीज कर्मचारी संप Live Updates : अनेक भागात वीज गायब; सिग्नल बंद, औद्योगिक क्षेत्रालाही फटका

पुणे : अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीने महावितरणच्या कार्यक्षेत्रात समांतर वीज वितरण परवान्यासाठी अर्ज केला आहे. याद्वारे महावितरण कंपनी अदानी समूहाला विकली जाणार असल्याची चर्चा आहे. याचा निषेध म्हणून वीज कर्मचाऱ्यांनी ७२ तासांचा संप पुकारला आहे. त्यामुळे अनेक भागांमधील वीजपुरवठा खंडित झाला आहे. सामान्य नागरिकांनाही याचा फटका बसला आहे. माणिकबाग, शिवणे-उत्तमनगर भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याचे नागरिक सांगत आहेत. शिवणे औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखाने लाईट नसल्याने बंद आहेत. ‘सिंहासन न्यूज’लाही आपल्या भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याचे कळवत आहेत.
पिंपरी परिसरातही वीजपुरवठा विस्कळीत होता. नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) आनंदनगर, सनसिटी परिसरात पहाटे साडेतीनपासून वीज पुरवठा खंडित आहे. तर धायरी परिसरात काही भागात आणि कात्रज, टिंगरे नगर, विश्रांतवाडी, कसबा पेठ परिसरातही वीज नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
पुण्यातील शिवणे औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखाने लाईट नसल्याने बंद आहेत त्याचा परिणाम जाणवायला सुरुवात झाली आहे. अनेक कारखान्यातील कामगार कामावरती आले असून लाईट नसल्याने त्यांना माघारी जाण्याची वेळ आली आहे. लाईट नसल्याने काम नाही, परिणामी आजचा रोजगारही बुडणार आहे . त्याचबरोबर आज काम पेंडिंग असल्याने त्याचा लोड उद्या येईल असेही कर्मचारी सांगत आहेत.
पिंपरी परिसरात एकूण १२००० लहानसहान कंपन्या आहेत. या कंपन्या वीज नसल्याने एक दिवस बंद राहिल्यास त्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.




