महाराष्ट्र

देश विकण्याचे पाप नरेंद्र मोदींनी केले ; नाना पटोले यांचा कोथरूडमधील लसीकरण प्रारंभ कार्यक्रमात मोदींवर निशाणा..

पुणे – Pune city स्वातंत्र्यानंतर साठ वर्षात कॉंग्रेसने देश उभा केला. देशाचा विकास साधला. मात्र, विकासाच्या बाता मारणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारने करोनाच्या काळात लोकांना घरी बसवून देश विकण्याचे पाप केले, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. देश वाचविण्यासाठी राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांंनी स्पष्ट केले. Narendra Modi committed the sin of selling the country;  Nana Patole targets Modi at vaccination inauguration program in Kothrud ..

नगरसेवक चंदूशेठ कदम यांच्यातर्फे राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक ११ मध्ये सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्राचे उद्घाटन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते आज रविवारी झाले. यावेळी कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, महापालिकेतील गटनेते आबा बागूल, नगरसेवक अरविंद शिंदे, अविनाश बागवे, सुनील शिंदे, कमल व्यवहारे, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, विजय खळदकर, शिवा मंत्री, अमीर शेख, विशाल मलके आदी उपस्थित होते. या प्रसंगी चंदू शेठ कदम यांच्या वतीने  लसीकरणासाठी २५ लाख रुपयांचा धनादेश भारती हॉस्पिटलकडे सुपूर्द करण्यात आला.

IMG 20210522 WA0203

पटोले म्हणाले, काँग्रेसने इतक्या वर्षात उभे केलेले कार्य मोदी सरकारने मोडीत काढले. नोटाबंदी आणि जीएसटी आणून देशाला देशोधडीला लावले. काळा पैसा, जीएसटी, पंधरा लाखांचे अमिष दाखवून नागरिकांना फसवले. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देशाच्या सीमा बंद करा, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले होते. पंतप्रधान मोदींनी मात्र, ते धुडकावून लावत अमेरिकेचे तत्कालिन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना गुजरातमध्ये आणून त्यांचा प्रचार केला.चीनच्या अध्यक्षांनाही भेटले. त्यातून करोनाचा प्रसार वाढला. मोदी सरकारने करोना काळात लोकांच्या मनात भीती निर्माण केली. थाळ्या वाजवायला लावल्या. लोकांना घरात बसवून त्याच काळात कॉंग्रेसने उभ्या केलेल्या संस्था, कंपन्या विकल्या. अनेक कुटुंब उद्ध्वस्त केली. लस तयार झाल्यावर ती देशातील नागरिकांना न देता पाकिस्तानसह जगभर मोफत वाटली असा आरोप त्यांनी केला.

काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या कोथरुडवर पुन्हा पकड निर्माण करू : डॉ. विश्वजीत कदम
डॉ. विश्वजीत कदम म्हणाले की, अच्छे दिन म्हणणाऱ्यांनी देशाची वाट लावली आहे. भाजपला महाराष्ट्रातून भाजप हद्दपार करण्याचे काम केवळ नाना पटोले व कॉंग्रेसच करेल. लसीकरणाच्या बाबतीत केंद्राने महाराष्ट्रासोबत दुजाभाव केला.  मात्र, महाविकास आघाडी राज्यातील नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण करेल. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्यास सांगितले आहे. त्यानुसार  कोथरूडमध्ये सुरू झालेली ही लसीकरण मोहीम सर्वत्र राबवली जाईल. कोथरूड हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिला असून त्यावर आम्ही पुन्हा पकड निर्माण करू,

माझा प्रभाग कोरोना मुक्त करणार : चंदू कदम
कोरोनामुक्ती साधण्यास लसीकरणाचा अत्यंत महत्त्वपूर्ण वाटा आहे. काँग्रेसचे नेते आदरणीय राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरु करण्यात आलेल्या मोफत लसीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून माझा संपूर्ण प्रभाग कोरोनामुक्त करणार, अशी ग्वाही कोथरूड परिसरातील प्रभाग क्रमांक ११ चे नगरसेवक  रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांनी आज कार्यक्रमात दिली. भारती हॉस्पिटलच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या लसीकरण मोहिमेत पाच हजार गरजू महिलांना मोफत लस दिली जाईल, असे चंदूशेठ कदम यांनी सांगितले. आबा बागूल यांनी आभार मानले.

IMG 20210619 WA0147

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये