बावधन मधील महिलांचे अमृता फडणवीस यांनी केले कौतुक ; महिलांनी महिलांसाठी बसवलेल्या सिद्धीच्या गणपतीची फडणवीस यांनी केली आरती

बावधन : पियुषा किरण दगडे पाटील आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी मिळून महाराष्ट्रात प्रथमच महिलांनी महिलांसाठी बसवण्यात आलेल्या “सिद्धीचा गणपती” ची आरती काल अमृता देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.
यावेळी अमृता फडणवीस यांनी उपस्थित सर्व महिला भगिनींशी संवाद साधला आणि महाराष्ट्रात प्रथमच साजरा होत असणाऱ्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक करून गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून सुप्रसिद्ध सिने अभिनेता आकाश ठोसर आणि पुणे जिल्ह्याच्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील-ठाकरे, माजी नगरसेवक किरण दगडे पाटील उपस्थित होते. तसेच विद्याधर अनासकर, नगरसेविका डॉ. श्रद्धा -प्रभुणे पाठक, वैशाली सणस, शिल्पा ठोंबरे, पल्लवी वैद्य, नीलम कुलकर्णी आणि महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
यावेळी अमृता फडणवीस,अभिनेता आकाश ठोसर, अंकिता पाटील-ठाकरे यांनी शिवमुद्रा ढोल पथकात सहभागी होत ढोल वादनही केले.
बावधन बुद्रुक मधील सूर्यदत्ता कॉलेजच्या समोरील मैदानावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांनी एकत्र येत सिद्धीच्या गणपतीची स्थापना करत एक नवा आदर्श समाजासमोर मांडला आहे. महिलांनी महिलांसाठी स्थापन केलेल्या या सिद्धीच्या गणपतीची चर्चा सध्या महाराष्ट्रभर सुरू आहे.
















