बार्टीची संविधान दिंडी; आळंदी ते पंढरपूर पर्यत समतादुतांनी केला वारकरी बांधवांमध्ये संविधानाचा जागर

पंढरपुरात बार्टीच्या संविधान दिंडीचा करण्यात आला समारोप
पुणे : डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वारीमध्ये संविधान दिंडी सहभागी झाली होती. या दिंडीचा समारोप नुकताच पंढरपुरात करण्यात आला.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, बार्टीच्या महासंचालक दीपा मुधोळ -मुंडे, बार्टीच्या निबंधक डॉ. सुचिता शिंदे, विभागप्रमुख डॉ. बबन जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी बांधवांमध्ये संविधानाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी संविधान दिंडी च्या माध्यमातून आळंदी ते पंढरपूर पर्यत दि ८ जुलै ते २४ जुलै २०२६ दरम्यान समतादुतांनी वारकरी बांधवांमध्ये संविधानाचा प्रसार करुन जनजागृती केली. संविधान दिंडी पंढरपूर येथे दाखल झाल्यानंतर वारकरी व नागरिकांनी मोठ्या उत्साहाने संविधान दिंडीचे स्वागत केले.

भारतीय राज्यघटनेने नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि न्याय मिळवून दिला. तसेच मूलभूत अधिकार बहाल केले. त्यामुळेच आज आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. संविधानीक मुल्ये व राज्यघटनेची वारकरी बांधवांना ओळख होऊन त्यांच्यामध्ये महापुरुषांच्या व संतांच्या समतेच्या विचारांचा जागर करण्यात आला. तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि बार्टी संस्थेच्या विविध योजनांचा प्रसार करण्यात आला.



डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पंढरपूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहिर प्रबोधनकार राजेंद्र कांबळे यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून संविधानाचा तसेच संतांच्या व महापुरुषांच्या समतेच्या विचारांचा जागर करुन प्रबोधन केले.
याप्रसंगी सामुदायिकपणे भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.



या प्रबोधन कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक एस. ए. देवकुळे, सोलापूर जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य जितेंद्र बनसोडे, माजी नगरसेवक सुनील सर्वगोड, रिपाइंचे अध्यक्ष संतोष पवार, सामाजिक कार्यकर्ते रवी शेवडे, अॕड. किर्तीपाल सर्वगोड, वारकरी रावसाहेब कोमवाड (नांदेड), मिरा भवर (पुणे), बार्टीच्या सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक रंजनी वाघमारे, प्रकल्प अधिकारी उषा भिगारे, रामदास लोखंडे, राहुल कवडे, सोलापूरच्या समतादुत प्रकल्प अधिकारी प्रणिता कांबळे, सोलापूर जिल्ह्यातील समतादूत यांच्यासह मोठ्या संख्येने वारकरी बांधव व नागरिक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांना संविधान, प्रस्ताविका, जातीव्यवस्थेचे निर्मुलन, आणि सन्मानचिन्ह भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांनी बार्टीच्या संविधान दिंडीच्या उपक्रमाचे कौतुक करुन अभिनंदन केले आहे.
समतादुतांनी वारकरी बांधव व नागरिकांना विविध कार्यक्रमांदवारे संविधानाची ओळख करून दिली तसेच सामाजिक न्याय विभाग आणि बार्टीच्या विविध योजनांचा प्रसार व प्रचार केला.



सुत्रसंचलन रामदास लोखंडे यांनी केले. आभार राजर्षी कांबळे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व समतादुतांनी मेहनत घेतली.



