कोथरूड डेपो, शांतिबन आणि एकलव्य कॉलेज चौकातील वाहतूक समस्येची पाहणी..

नगरसेविका रुपाली पवार, अल्पना वरपे व वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतला परिस्थीचा आढावा
गर्दीच्या वेळेत वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद
पुणे : कोथरूड डेपो चौक, शांतिबन चौक आणि एकलव्य कॉलेज चौक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी सातत्याने नगरसेविका रुपाली पवार व अल्पना वरपे यांच्याकडून पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत पुणे शहर वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष स्थळपाहणी केली.
नगरसेविका तथा वृक्ष प्राधिकरण समिती सदस्या रुपाली सचिन पवार आणि नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा अल्पना वरपे यांच्या समवेत वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी विविध चौकांमध्ये होणारी वाहतूक कोंडी, वाहनांची वाढती वर्दळ, नागरिकांची ये-जा तसेच गर्दीच्या वेळेतील वाहतुकीच्या समस्यांबाबत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

यावेळी वाहतूक विभागाचे अधिकारी गवळी यांनी नागरिकांना सोयीस्कर ठरतील अशा विविध वाहतूक नियोजनाच्या पर्यायांची माहिती दिली. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिल्या.
विशेषतः सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी संबंधित चौकांमध्ये वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली. नागरिकांच्या सूचनांचा विचार करून ही मागणी सकारात्मक पद्धतीने घेण्यात आली असून, गर्दीच्या वेळेत वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्याचे संकेत वाहतूक विभागाकडून देण्यात आले.
नागरिकांच्या सूचनांना प्राधान्य
कोथरूड डेपो चौक, शांतिबन चौक आणि एकलव्य कॉलेज चौक परिसरातून दररोज मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी, नोकरदार आणि वाहनचालकांची ये-जा असते. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न सातत्याने निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या अडचणी आणि सूचनांचा विचार करून वाहतूक व्यवस्थेत आवश्यक बदल करण्यावर भर देण्यात येत आहे.
वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा वेळ वाया जाण्याबरोबरच अनेकदा अपघाताचा धोकाही निर्माण होतो. त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासोबतच नागरिकांची सुरक्षितता हा देखील महत्त्वाचा मुद्दा असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
“वाहतुकीसंदर्भातील नागरिकांचा त्रास कमी व्हावा, वाहतूक सुरळीत व्हावी आणि नागरिकांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. नागरिकांच्या समस्या आणि सूचनांचा विचार करून संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मात्र, वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाच्या उपाययोजनांसोबतच नागरिकांनीही वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे,” असे नगरसेविका तथा वृक्ष प्राधिकरण समिती सदस्या रुपाली सचिन पवार यांनी सांगितले.
दरम्यान, वाहतूक विभागाकडून सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी झाल्यास या तीनही महत्त्वाच्या चौकांमधील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.



