नळस्टॉप चौकात नाईट लाईफमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता; अनुचित प्रकार घडल्यास पोलीस प्रशासन जबाबदार राहणार का ?

कोथरूड : नळ स्टॉप चौकात रात्री बारा नंतर स्टॉल व फूड सेंटर चालू करून सुरू होत असलेल्या नाईट लाईफ मुळे अराजकता माजण्याची शक्यता निर्माण झाली असताना अलंकार व डेक्कन पोलिसांची बघ्याची भूमिका कितपत योग्य आहे आहे असा सवाल आता सर्व सामान्य जनता विचारू लागली आहे. अलंकार पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी आम्ही कारवाई करतो असे सांगत असली तरी मग हे सुरू कसे राहत आहे. असे बेकायदा व नियमा विरुद्ध काम करणाऱ्या स्टॉलचालक व फूड सेंटर यांना पोलिसांची भीती राहिली नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे. वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाकडून एकदा कारवाई करण्यात आली मात्र त्यातही सातत्य नसल्याचे दिसत आहे.
कोथरूड मधील नळ स्टॉप चौकातील नाईट लाईफ विषयाची चर्चा थांबता थांबत नाही कारण एवढे नियमबाह्य काम सुरू असताना याला नक्की आश्रय कोणाचा मिळत आहे. कोण हितसंबंध जोपासत आहे, कोणाचे खिसे गरम होत आहेत अशा चर्चांना उधाण आल आहे. पोलिस प्रशासन एखादी मोठी अनुचित घटना होण्याची वाट पाहत आहे का मगच कडक कारवाईची बडगा उगारून आपला खाक्या दाखवला जाणार का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.
नळ स्टॉप चौकात रात्री १२ वाजल्यानंतर नाईट लाईफ सुरू होते आणि ती पहाटे पर्यंत सुरू राहत असल्याचे सध्याचे चित्र आहे. रात्री उशीरा या चौकातील दुकाने खुली होतात, रस्त्यावर पदपथावर, पुलाखाली मोठ्या संख्येने स्टॉल लागतात. मग या स्टॉल व दुकानाभोवती तरुण तरुणींची गर्दी व्हायला सुरुवात होते. सिगारेटचा धूर हवेत सोडत येथे पोटाची भूक भागवली जाते. सिगारेट बरोबर इतर व्यसनांना इथे जोड मिळत असल्याची चर्चा आहे. मद्यधुंद अवस्थेतील तरुण तरुणी याठिकाणी उशीरपर्यंत गोंधळ घालताना दिसतात. या ठिकाणी मागे एकावर हल्ला झाल्याचा प्रकार ही घडल्याचे सांगितले जात आहे.
वरील प्रकार सुरू असताना पोलिसांची गाडी येऊन जाते पण काहीच होत सर्व सुरुळीत चालू राहते याचा अर्थ नक्की काय घ्यायचा असा प्रश्न ही परिस्थिती आपल्या डोळ्यांनी पाहणाऱ्या नागरिकांना पडत आहे. नियम बाह्य काम करत असताना पोलिसांच्या कारवाईची भीती न वाटणे हे कसे घडत असेल याची उकल मात्र होत नाही.
रात्री बारा नंतर चालणार हा गैरप्रकार नक्की थांबणार कधी आणि तो थांबणार नसेल तर या ठिकाणी एखादी मोठी घटना घडली तर त्याला कोणाला जबाबदार धरायचे ? रात्री कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जबाबदारी पोलिसांची असते पालिका प्रशासन त्यात काही करू शकत नाही मग पोलीस ही जबाबदारी घेणार का असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
सिंहासन News ने याबाबत पहिली बातमी प्रसिद्ध केल्यानंतर पालिकेने येथील स्टॉलवर कारवाई केली होती. येथील कारवाईत सातत्य राहील असे त्यावेळी महापालिका सहाय्यक आयुक्त राजेश गुर्रम यांनी सांगितले होते. त्यामुळे हे सातत्य कसे राहणार हे पहावे लागणार आहे. या नाईट लाईफ बाबत संपूर्ण जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची असून तसा पत्रव्यवहार ही वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने पोलीस प्रशासनाशी करण्यात आला आहे. मात्र या विषयातील पोलीस प्रशासनाची भूमिका सर्वसामान्यांच्या मनात शंका उपस्थित करणारी आहे. एकूणच या विषयाबाबत उपस्थित होणारे अनेक प्रश्न येथील प्रकार थांबल्याशिवाय थांबणार नाहीत हेच आता म्हणावे लागेल.
स्थानिक नागरिकांनी त्रास होऊ नये आणि रात्री उशिरा सुरू होत असलेल्या या प्रकारामुळे कोणती अनुचित घटना घडू नये यासाठी सुरवातीपासून याला विरोध करणारे मनसेचे मंदार बलकवडे म्हणाले हा प्रकार नक्की कोणाच्या आशीर्वादामुळे सुरू आहे एवढेतर सर्वसामान्य जनतेला नक्कीच कळू शकते. या गैरप्रकारावर पोलीस का कारवाई करत नाहीत. पालिका प्रशासन कारवाईत सातत्य का ठेवत नाही हा मोठा प्रश्न आहे. या प्रकाराचा धोका ओळखून कर्तव्यनिष्ठ व जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांनी पावले उचलणे आवश्यक आहे, मात्र तसे होताना दिसत नसल्याने खंत वाटत आहे. या ठिकाणी कोणता प्रकार घडल्यास हेच कर्तव्यनिष्ठ व जबाबदार पोलीस व पालिका अधिकारी याला जबाबदार राहतील एवढे मात्र नक्की..







