पुण्यात पाली भाषेचे ज्येष्ठ अभ्यासक प्रकाश नाईक यांचे निधन

पुणे : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, भारतीय बौद्ध महासभेचे पुणे शहर उपाध्यक्ष तथा संस्कार विभाग प्रमुख तसेच पाली भाषेचे ज्येष्ठ अभ्यासक प्रकाश नारायण नाईक (वय 82) यांचे अल्पशा आजाराने सोमवार (दि. 27 जुलै 2026 ) रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन बहिणी, तीन मुले, सुना, नातवंडे तसेच मोठा परिवार आहे.

प्रकाश नाईक हे पाली भाषेचे अभ्यासक होते. माजी श्रामनेर असोसिएशनचे संस्थापक, येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हाऊसिंग सोसायटी ट्रस्टचे माजी संचालक, सिद्धार्थ मंडळाचे बौद्ध विधीकर्ते तसेच पुणे शहरातील बौद्ध धर्मीय व आंबेडकरी चळवळीतील विविध संस्था संघटना यांच्या सामाजिक धार्मिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. बौद्ध धम्मातील पाली भाषेच्या गाथा मराठीत अनुवादित करून अत्यंत सोप्या भाषेत सांगून बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले. खडकी येथील 512 आर्मी बेस वर्कशॉप येथून अधिकारी पदावरून ते निवृत्त झाले होते. बौद्ध धम्म तसेच आंबेडकरी साहित्यावर त्यांचा सखोल अभ्यास होता. बौद्ध धम्माच्या अभ्यासासोबतच कलात्मक वाचन, लेखन, चित्रकला, गायन व काव्य निर्मिती यामध्ये देखील ते अग्रेसर होते. बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसाराचे काम त्यांनी अखेरपर्यंत केले. त्यांच्या पार्थिवावर येरवडा विद्युतदाहिनी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आंबेडकरी चळवळीतील विविध सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या निधनामुळे बौद्ध धम्मातील पाली भाषेच्या अभ्यासकांमधील एक तज्ञ मार्गदर्शक गमावला असल्याच्या भावना व्यक्त करण्यात येत आहेत.



