लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सफाई कामगारांच्या समस्यांकडे इक्वेरा फाउंडेशनने वेधले लक्ष

पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त इक्वेरा फाउंडेशनच्या वतीने विमाननगर येथील आरोग्य कोठीला भेट देऊन सफाई कामगारांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यात आल्या. फाउंडेशनच्या संचालिका प्राची साळवे यांनी सफाई कामगारांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या आणि त्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.

यावेळी सफाई कामगारांनी सार्वजनिक सुट्ट्या या महापुरुषांच्या जयंती तसेच सण-उत्सवांच्या दिवशीही सुट्टी मिळत नसल्याची तक्रार केली. महाराष्ट्र दिन, स्वातंत्र्यदिन यांसारख्या राष्ट्रीय सणा सारख्या महत्त्वाच्या दिवशीही नियमितपणे काम करावे लागते, मात्र त्याबदल्यात अतिरिक्त मानधन किंवा इतर लाभ दिले जात नसल्याचे त्यांनी सांगितले. कंत्राटी कामगारांकडून कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अधिक वेळ काम करून घेतले जात असल्याचा तसेच कामाच्या तासांमध्ये समानता नसल्याचाही आरोप करण्यात आला. काही कामगारांनी कामाच्या ठिकाणी अपमानास्पद वागणूक, अयोग्य संवाद पद्धती आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही सांगितले.
यानंतर सुमित एंटरप्रायझेसचे समन्वयक संतोष बोडके यांच्याशी चर्चा करण्यात आली. संबंधित कामकाज कार्यादेशानुसार सुरू असून आवश्यक प्रशासकीय माहिती शासकीय कार्यालयात उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच स्वच्छता निरीक्षक सचिन लडकत यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे ते शासकीय कामात व्यस्त असल्याने सोमवारी सविस्तर बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान प्राची साळवे, देव्यानी महानाग, सफाई कामगार शीतल पवार व इतर कामगारांनी निर्भय प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखिल गायकवाड यांच्या सोबत पुढील कार्यवाहीबाबत चर्चा केली. नगर रोड क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संजय पोळ यांचीही या संदर्भात भेट घेण्यात येणार आहे. तसेच या पुढील काळात महापालिका आयुक्तांकडे या संदर्भात कायमस्वरूपी उपाय योजना करण्याबाबत मागणी करण्यात येणार आहे.
सफाई कामगारांच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी, समान वागणूक, सुरक्षित कामाचे वातावरण, न्याय्य कामाचे तास आणि कायद्यानुसार सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी संबंधित प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जाणार असल्याचे इक्वेरा फाउंडेशनने यावेळी स्पष्ट केले.



