महाराष्ट्र

महामार्ग पोलीस केंद्र बोरघाटचे मोठे यश; विविध उपाययोजनांमुळे जुलै महिन्यात एकही प्राणांतिक अपघात नाही

प्रभारी अधिकारी स्वप्निल पाटील यांची माहिती

पुणे : महामार्ग पोलीस केंद्र, बोरघाट दस्तुरी (जि. रायगड) हद्दीतील द्रुतगती मार्ग कनेक्टिंग लिंक व एन एच 48 वरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंखे तसेच रायगड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलीस उपअधीक्षक पुष्पलता दिघे, पोलीस निरीक्षक भरत शेंडगे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रत्यक्ष काम सुरू आहे. या अनुषंगाने करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमुळे या भागात जुलै महिन्यात एकही प्राणांतिक अपघात झालेला नाही.

Img 20260222 wa00063491038201882637992


या संदर्भात माहिती देताना प्रभारी अधिकारी स्वप्निल पाटील म्हणाले, महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी ( झिरो फॅटेलिटी ) विशेषतः द्रुतगती मार्गावरील ‘ब्लॅकस्पॉट’वर आवश्यक त्या उपाययोजना करून त्या ठिकाणी साईन बोर्ड लावण्यात आलेले आहेत. वाहन चालकांचे प्रबोधन कार्यक्रम घेऊन अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या बाबी तसेच वाहतूक नियम व शिस्तीचे पालन करणे याबाबत सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. महामार्गावर रात्रगस्त, पेट्रोलिंग व फिक्स पॉईंट नेमून बेजबाबदार वाहनचालकांविरुद्ध जुलै 2026 कालावधीत महाराष्ट्र मोटर वाहन कायद्यानुसार एकूण 6 हजार 876 कारवाया करण्यात आलेल्या आहेत. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर जानेवारी ते जुलै 2026 कालावधीत 80 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या संपूर्ण कारवाई व उपाययोजनांमुळे जुलै 2026 मध्ये बोरघाट हद्दीत एकही प्राणांतिक अपघात घडलेला नसून इतर अपघातांच्या संख्येतही घट झालेली आहे. भविष्यात अशा प्रकारे सातत्याने उपाययोजना तसेच कारवाया करून नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी महामार्ग पोलीस प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रभारी अधिकारी स्वप्निल पाटील यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये