छगन भुजबळांच्या वक्तव्यानंतर ओबीसी नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याविरोधात मंत्री छगन भुजबळ यांनी ठाम भूमिका घेतल्यानंतर ओबीसी समाजाचे नेते एकवटायला सुरुवात झाली आहे. मुंबईत ओबीसी नेत्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीला प्रकाश शेंडगे, जे.पी. तांडेल, लक्ष्मण गायकवाड यांच्यासह इतर ओबीसी नेते आणि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहतील. त्यामुळे या बैठकीत मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत ओबीसी नेते काय निर्णय घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रमुख बबनराव तायवाडे आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हेदेखील आक्रमक झाले आहेत. छगन भुजबळांनी भूमिका मांडलीआहे की, आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. फक्त ओबीसींना मिळालेल्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. तसेच मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायला नको.
ओबीसींकडे जमीन, घर नाही
ओबीसी समाजातील ५० ते ६० टक्के जाती अशा आहेत की, ज्यांच्याकडे जमीन नाही, घर नाही. ओबीसी प्रवर्गात राहूनही त्यांची स्थिती सुधारलेली नाही. मराठा नेते म्हणतात की, ओबीसींसाठी आमच्या मुलांनी आत्महत्या कराव्यात का? ओबीसी प्रवर्गात अगोदरच इतक्या जातींचा समावेश आहे. त्यामध्ये मराठ्यांचा समावेश झाल्यास कोणाच्या वाट्याला काय येणार? अशाने सर्वांनाच अर्धवट आरक्षण मिळेल, उपाशी मरायची पाळी येतील. मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश झाल्यास, ‘बळी तो कान पिळी’ सूत्रानुसार मोठ्या समाजालाच त्याचा फायदा मिळेल, अशी भीती विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.


