पुणे शहर

चंद्रकांत पाटील व चंद्रकांत मोकाटे भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण

बंद दाराआड झाली चर्चा

अमोल साबळे, विनायक बेदरकर
पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे नेते व माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याचे समजत आहे. चर्चेचा तपशील जरी समजला नसला तरी या भेटीची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. या भेटीमुळे पुढील राजकीय समीकरणे उदयास येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मधून विधानसभा निवडणूक लढवताना निवडणुकीस इच्छूक असणारे शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांची  समजूत काढून त्यांना आपल्या बरोबर घेतले होते. मोकाटे यांनीही युती धर्म पाळत भाजपला साथ दिली होती. याच मदतीची परतफेड करण्यासाठी नवीन राजकीय जुळवाजुळव सुरू झाली असावी. असे तर्क वितर्क लढवले जात आहेत.

मागील महापालिका निवडणुकीमध्ये मोकाटे यांचे पुतणे माजी नगरसेवक योगेश मोकाटे यांना भाजपकडून तिकीटाची ऑफर दिल्याची चर्चाही त्यावेळी होती. ही निवडणूक योगेश मोकाटे यांनी लढवली नव्हती.

राज्यात शिवसेनेची सत्ता आल्यानंतर पक्ष नेतृत्वाकडून पुणे शहरातील नेत्यांना मोठी राजकीय जबाबदारी मिळण्याची अपेक्षा आहे. परंतु अद्याप पर्यंत त्याबाबत कोणत्याही हालचाली झाल्या नसल्याने नेत्यांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे. या अस्वस्थते मधूनच ही भेट झाली असावी. अशी शक्यता राजकीय अभ्यासक वर्तवत आहेत.

या भेटीमुळे कोथरूड बरोबरच पुणे शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी २०२२ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून या भेटीकडे पाहिले जात आहे.  याबाबत चंद्रकांत मोकाटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगत या विषयावर अधिक बोलणे टाळले.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये