पेप्सिको कंपनीच्या डिलरशीपमध्ये पार्टनरशीप देण्याच्या बहाण्याने दोन कोटींची फसवणूक; आरोपी संतोष चिंचवडेला न्यायालयीन कोठडी
पुणे : पेप्सिको कंपनीच्या डिलरशीपमध्ये पार्टनरशीप देतो, असे म्हणून दोन कोटींची फसवणूक करणाऱ्या संतोष चिंचवडे (रा. बाणेर) या आरोपीची पोलीस कोठडी संपल्यावर त्याची रवानगी 24 मार्चपर्यंत येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. या घटनेतील दुसऱ्या आरोपी रोषणा चिंचवडे या अद्याप फरारी आहेत.
आरोपी संतोष चिंचवडे व रोषणा संतोष चिंचवडे, अर्चना जगताप यांनी रमेश दिलीप गायकवाड, जयंत लिमये, सदाशिव कुलकर्णी, प्रतीक राणवाडे, बबन रासकर, युवराज धनकुडे यांची दोन कोटींची फसवणूक केल्याची फिर्याद दिलेली आहे. फिर्याद दाखल झाल्यावर आरोपी फरार झाले होते. या आरोपींचा शिवाजीनगर कोर्टात जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. आरोपींपैकी अर्चना जगताप यांना जामीन मंजूर झाला. तर आरोपी रोषणा चिंचवडे आणि संतोष चिंचवडे यांना जामीन मंजूर झाला नाही. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आरोपीचा माग काढत संतोष चिंचवडे या फरार आरोपीला अटक केली. त्यानंतर आरोपी संतोष चिंचवडे याला न्यायालयाने दोन वेळा पोलीस कोठडी सुनावली होती. आरोपीला पोलीस कोठडी संपल्यावर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने फरार आरोपी रोषणा चिंचवडे हिचा शोध घ्यावयाचा असल्याने आरोपी संतोष चिंचवडे याची रवानगी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत 24 मार्चपर्यंत केली आहे. आरोपींविरुद्ध आणखी आकाश जाधव, संदीप ताम्हाणे, सचिन बालवाडकर, संतोष सातव या नागरिकांनीही तक्रार दिली आहे.