आज ठरणार हवेली अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचा मानकरी ; निकाली कुस्त्यांमध्ये कोण मारणार बाजी..

पुणे : कर्वेनगरमध्ये मैत्री प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हवेली अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचा आज अंतिम दिवस असून आज या स्पर्धेचा विजेता व घेण्यात आलेल्या निकाली कुस्ती मध्ये कोण बाजी मारणार हे ठरणार आहे. त्यामुळे कुस्ती प्रेमी मंडळींमध्ये आजच्या निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
आजच्या अंतिम दिवशी महाराष्ट्र केसरी पै. बाला रफिक शेख विरुद्ध उप महाराष्ट्र केसरी अक्षय शिंदे तसेच महा.चॅम्पियन वैभव तांगडे विरुद्ध राष्ट्रीय विजेता विजय रानवडे यांच्यातील निकाली कुस्त्यांचा चुरशीच्या सामना रंगणार आहे. कोथरुड ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व मैत्री प्रतिष्ठानचे संस्थापक विजय खळदकर यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
हवेली अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचा मानकरी कोण ठरणार तर निकाली कुस्तीत कोण कोणाला भारी ठरणार हे संध्याकाळी ठरणार आहे. पहिल्या दिवशी म्हणजे १४ एप्रिल रोजीही नागरिकांनी कुस्त्या पाहण्यासाठी गर्दी केली होती. आज तर अंतिम लढती होणार असल्याने मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकवर्ग कै. नानासाहेब बराटे क्रीडा नागरी मध्ये उपस्थित राहणार आहे.
काल १४ एप्रिल रोजी स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा पार पडला. डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या कुस्त्या कुस्ती प्रेमी मंडळींना पहिला मिळाल्या. राज्यमंत्री विश्वजित कदम, अभिनेते प्रवीण तरडे यांनी स्पर्धेला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. तर पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, मोहन जोशी, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले होते.










