पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचा नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळात समावेश

पुणे लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदा निवडून आलेले खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. त्यांचा मोदी ३ मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. महाराष्ट्रातून आतापर्यंत नितीन गडकरी. पीयूष गोयल, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव. रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ यांना फोन आले आहे. रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे मध्यंतरी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. परंतु लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांचा अजून भाजप प्रवेश झाला नाही. मात्र, त्यांच्या सुनेला मंत्रीपद मिळत आहे. खडसे परिवार खासगी विमानाने दिल्लीला रवाना झाला आहे.
पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन आला आहे. त्यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश होणार आहे. मुरलीधर मोहोळ प्रथमच पुण्यातून खासदार झाले. त्यानंतर त्यांना सरळ मंत्रीपद मिळत आहे. मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला होता. महापौर ते केंद्रात मंत्रीपद अशी त्यांची कारकीर्द असणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रात भाजप वाढवणे आणि मराठा समाजातील नेत्यास संधी देणे ही भूमिका ठेऊन पहिल्यांदा खासदार झालेल्या मुरलीधर मोहोळ यांना संधी मिळाली आहेत. लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीची चांगली कामगिरी झाली. त्यामुळे त्या ठिकाणी भाजप भक्कम करण्याची जबाबदारी मोहोळ यांना करावी लागणार आहे. पंतप्रधान कार्यालयातून आज सकाळी मोहोळ यांना संपर्क साधण्यात आला आणि त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे.





















