पुणे महापालिकेने पीटी-३ फॉर्म भरलेल्या मिळकतधारकांना सवलतीची दुरुस्त बिले त्वरित द्यावीत.. अन्यथा आंदोलन..पृथ्वीराज सुतार यांचा इशारा

पुणे : पुणे मनपाच्या टॅक्स विभागकडून मिळकतधारकांना ४०% मिळकतकरामध्ये सवलत दिली जात होती, ती सवलत मिळवण्यासाठी पीटी-३ फॉर्म भरून देण्याबाबत मनपाच्या कर अकारणी व कर संकलन विभागाकडून सांगण्यात आले, त्या प्रमाणे लाखो पुणेकरांनी पीटी-३ फॉर्म भरून दिले परंतु त्याची कोणतीही शहनिशा न करता २०२५-२६ च्या मिळकतकरामध्ये त्या मिळकतधारकांना ४०% सवलत न देता बिले देण्यात आली आहेत, त्यामुळे हा पुणेकरांवर अन्याय असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी गटनेते, माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी केला आहे.
या संदर्भात सुतार यांच्याकडून कर अकारणी व कर संकलन विभागाचे उपायुक्त अविनाश सपकाळ यांना निवेदन देण्यात आले असून त्यामध्ये पीटी-३ फॉर्म भरलेल्या मिळकतधारकांसाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत एक कक्ष सुरू करावा व त्या ठिकाणी त्यांना सवलतीची दुरुस्तीची बिले देण्याची सुविधा उपलब्ध करून दयावी अशी मागणी करण्यात आली आहे.

लाखो पुणेकरांनी पीटी-३ फॉर्म भरून दिलेले आहेत पण त्याची कोणतीही शहनिशा न करता २०२५-२६ च्या मिळकतकरामध्ये त्या मिळकतधारकांना ४०% सवलत न देता बिले देण्यात आली आहेत, अशा मिळकत धारकांना तातडीने सवलत दिल्याची दुरुस्तीची बिले न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा पृथ्वीराज सुतार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.









