सिग्नलवर फुलं विकणारी मुलगी पीएचडीसाठी अमेरिकेत

मुंबई : ट्रॅफिक सिग्नलवर फुल विकणारी, झोपडपट्टीत राहणाऱ्या तरुणीने पीएचडीसाठी थेट अमेरिका गाठण्याची किमया केली आहे. सरिता माळी अशी ही किमया साधणाऱ्या तरुणीचे नाव आहे. खडतर परिस्थितीवर मात करत मुंबईच्या ट्रॅफिक सिग्नलवर फुल विकण्यापासून ते अमेरिकेची फेलोशिप मिळवण्यापर्यंतचा तिचा प्रवास अनेकांना प्रेरणा देईल असाच आहे.
सरिता मुंबईतील घाटकोपर परिसरात लहानाची मोठी झाली. इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत असताना सरिता तेव्हा वडिलांसोबत मुंबईच्या ट्रॅफिक सिग्नलवर फुलं विकण्यासाठी गाडीच्या मागे धावत असायची. फुलं विकली गेली तरच दिवसाकाठी 300 रुपये सुटायचे. मात्र, सरिताचे हेही दिवस पालटले. सरिताला लहानपणी वर्णभेदाचा सामना करावा लागला. मात्र, वडिलांचा खंबीर आधारामुळं सरिता डगमगली नाही. शिक्षणानंतर उच्चवर्गीय आपल्या इच्छेप्रमाणे आयुष्य जगू शकतात हे सरिताच्या वडिलांनी गावाकडे बघितलं होतं. म्हणूनच त्यांनी सरिताला शिकवण्याचा निर्णय घेतला.
दहावीनंतर सरिताने घरातच ट्युशन घेण्यास सुरुवात केली. आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ती मेहनत घेत होती. ट्युशनमधून येणारे पैसे साठवून तिने के.जे सोमय्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. सरिताचा संघर्ष पाहून तिची मोठी बहिण व दोन भावांनीही शिक्षणाला प्राधान्य दिलं. सरिता आता जेएनयू रिसर्च स्कॉलर अमेरिकामध्ये पीएचडीचा अभ्यास करत आहे.
सरिता माळीचे मुळ गाव उत्तर प्रदेशमधील जौनपुर जिल्ह्यातील आहे. पण तिचा जन्म मुंबईत झाला आहे.सरिताचे वडिल सिग्नलवर फुलं विकायचे. मात्र, या व्यवसायात फार कमाई नसल्याने त्यांच्या वाटेला अनेकदा भुकेले राहावे लागायचे. सरिताला परिस्थितीची जाणीव असल्याने आणि भविष्य घडवण्याची क्षमता शिक्षणात असल्याचे लक्षात आल्याने तिने उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. दिल्लीतील जे.एन.यु विद्यापीठात तिने हिंदी साहित्यात मास्टर्स करण्यासाठी प्रवेश घेतला. जे.एन.युमध्ये मास्टर्स करण्यासाठी आलेल्या सरिताने एम.ए., एम.फिलसोबतच पी.एच.डी. पूर्ण केली. त्यानंतर तिला पुन्हा एकदा अमेरिकेत पी.एच.डी. करण्याची संधी मिळाली आहे.
सरिताने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपला अनुभव सांगितला आहे. अमेरिकेतील दोन महाविद्यालयात माझी निवड झाली आहे. कॅलिफॉर्निया आणि वॉशिंग्टन विद्यापीठाने माझी फेलोशिपसाठी निवड केली. यात मी कॅलिफॉर्निया विद्यापीठ निवडले असून त्यांनी माझे मेरिट व शैक्षणिक पात्रता पाहून अमेरिकेची प्रतिष्ठित फेलोशिपमधील एक चान्सलर फेलोशिप मला दिली आहे, असे तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.




