पुणे पोलीस गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्याची शक्यता

पुणे : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सातारा पोलिसानंतर पुढे पुणे पोलिसही गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्याची शक्यता आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात 9 सप्टेंबर 2020 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पुणे पोलीस त्यांना अटक करण्याची शक्यता आहे.
कात्रज परिसरात राहणारे अमर रामचंद्र पवार (वय 35) यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. अमर पवार हे बांधकाम व्यावसायिक असून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणून काम पाहतात. सदावर्ते यांनी 7 ऑक्टोबर 2020 रोजी एका वृत्तवाहिनीवर बोलत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ही तक्रार देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा वंशजांचा एकेरी उल्लेख करुन सकल मराठा समाजाचा अपमान होईल व जाती-पातीत तेढ निर्माण होऊन दंगल भडकेल अशा प्रकारचे शब्द वापरल्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे. त्यामुळे पुणे शहर पोलीसही या गुन्ह्यात सदावर्ते यांना अटक करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
















