पुणेकरांनो सावधान! कात्रज प्राणीसंग्रहालयातून बिबट्या पळाला, शोध सुरूच…

पुणे : राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातून बिबट्या पळाल्याची घटना सोमवारी घडली आहे. या घटनेमुळे चांगलाच गोंधळ उडाला आहे. या बिबट्याला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. तेथील पिंजऱ्यामधून हा बिबट्या पळाला आहे. या प्राणीसंग्रहालयात तीन मादी आणि एक नर जातीचा असे एकूण चार बिबट्या आहेत, त्यातील नर जातीचा बिबट्या पिंजऱ्यामधून पळाल्याची घटना घडली आहे.
राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील या बिबट्याचा शोध अजूनही सुरूच आहे. अद्यापही या बिबट्याला पकडण्यात वन विभाग आणि प्रशासनाला यश आलेलं नाहीये. सोमवारी सकाळी ही घटना घडली, तेव्हापासून या बिबट्याचा शोध घेतला जात आहे. वन विभागाचे अधिकारी, अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि रेस्क्यू टीमकडून कात्रच्या प्राणीसंग्रहालयातून पळालेल्या या बिबट्याचा शोध घेतला जात आहे. पिंजऱ्यातून बाहेर पडलेला बिबट्या प्राणीसंग्रहालयातच असल्याची प्राथमीक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या घटनेला 24 तास उलटले असून अजूनही या बिबट्याचा शोध सुरूच आहे.

प्राण्यांच्या अदलाबदली कार्यक्रमांतर्गत हा बिबट्या कर्नाटकमधील हंपी येथून आणण्यात आला होता. प्राणी संग्रहालयातील प्राण्यांच्या अनाथालयात काही दिवसांपासून त्याला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. सोमवारी सकाळी सुमारे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास बिबट्या कक्षात नसल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर एकच खळबळ उडाली. पिंजऱ्याच्या लोखंडी सळाया वाकवून तो प्रसार झाल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. बिबट्या पसार झाल्याचं लक्षात येताच पर्यटकांना प्राणी संग्रहालयात येण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.









