लोकसभा निवडणुकीसाठी 7 टप्प्यात मतदानाची शक्यता, 14-15 मार्चला तारखा जाहीर होणार?

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाकडून 14 मार्च रोजी देशातील सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2019 प्रमाणेच यंदाही सात टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पहिल्या टप्प्यातील मतदान होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत निवडणूक आयोगाकडून लवकरच पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जाणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात कोणत्याही दिवशी निवडणुकीच्या तारखांची घोषणा होऊ शकते. त्या दिवसापासूनच आचरसंहिता लागू होईल. दरम्यान, सध्या निवडणूक आयोग देशातील सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीच्या अंतिम टप्प्यात आहे. सर्व राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला जातोय. निवडणूक आयोगाचे अधिकारी प्रत्येक राज्याचा दौरा करुन आढावा घेत आहेत. सर्व राज्यातील तयारीचा आढावा घेतल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होणार आहे.










