पुणे शहर

एमएच १२’ ही पुण्याची ओळख कायम राहणार, वाहनांसाठी लवकरच “हि”नवी सिरीज…

पुणे: पुण्यातील वाहनांची ओळख असलेली ‘एमएच १२’ ही इंग्रजी अक्षरांची मालिका संपत आली असली, तरी पुणेकरांची ही हक्काची ओळख कायम राहणार आहे. त्यासाठी आता ‘एम एच १२ १ ए’ या नव्या मालिकेचा पर्याय समोर आला आहे. देशात प्रथमच वाहनांच्या नंबरप्लेटवरील अक्षरांच्या सिरीजमध्ये ‘अंक’ आणि ‘अक्षर’ यांचा एकत्रित वापर केला जाणार आहे.

सध्या पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) ‘एमएच १२’ अंतर्गत शेवटची ‘झेड झेड’ ही सिरीज सुरू असून लवकरच ती संपणार आहे. ही मालिका संपल्यानंतर आरटीओकडे तीन अक्षरी सिरीज सुरू करणे शक्य नव्हते. त्यामुळे पुणे आरटीओने रस्ते व महामार्ग मंत्रालयाला ‘एमएच १२’ च्या पुढे ‘१ ए’ अशी मालिका सुरू करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे.

Img 20260222 wa00064513382578852640289

तत्पूर्वी, नवीन मालिका सुरू होईपर्यंत वाहन खरेदी करणाऱ्या पुणेकरांना ‘एमएच ६१’ या आरटीओ कोडने वाहनांचे रजिस्ट्रेशन करून दिले जाईल. सणासुदीच्या मुहूर्तावर वाहन खरेदी करण्यास इच्छुक ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. काही काळानंतर या वाहनांना नव्या मालिकेत ट्रान्सफर करण्याची सुविधा किमान निर्धारित शुल्क आकारून उपलब्ध करून दिली जाणार आहे. 

सुरुवातीला ‘एमएच ६१’ या नव्या क्रमांकाची चर्चा सुरू झाल्यामुळे ‘एमएच १२’ ही पुण्याची ओळख पुसली जाण्याची शंका व्यक्त केली जात होती. ही बाब लक्षात घेत केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पुण्याची ही ओळख जपण्यासाठी पाठपुरावा केला. त्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद  दिला आहे. यासंदर्भातील मसुदा लवकरच प्रसिद्ध केला जाणार असून त्यावर नागरिकांच्या हरकती सूचना मागवण्यात येणार आहेत. त्यानंतर नव्या मालिकेला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये