मुळशीकरांचा एकजुटीचा निर्धार : मुळशीची बदनामी थांबवण्यासाठी लोकचळवळ उभारण्याचे आवाहन..

कोथरूडमध्ये मुळशी बचाव समन्वय समितीची बैठक; ‘मुळशी पॅटर्न २’च्या नावाला विरोध
पुणे : मुळशी तालुक्याची ओळख, प्रतिष्ठा आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी पुणे शहरात वास्तव्यास असलेल्या मुळशीकरांनी एकजुटीने पुढे येण्याचा निर्धार केला आहे. मुळशीची चुकीच्या संदर्भात होणारी बदनामी थांबवण्यासाठी व्यापक लोकचळवळ उभारण्याचे आवाहन कोथरूड येथे झालेल्या बैठकीत करण्यात आले.
मुळशी बचाव समन्वय समितीची बैठक कर्वे रस्त्यावरील अंबर हॉलमध्ये नुकतीच पार पडली. यावेळी कोथरूडसह पुणे शहरातील विविध भागांत वास्तव्यास असलेले मुळशीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत ‘मुळशी पॅटर्न २’ या चित्रपटाच्या नावाला ठाम विरोध करण्यात आला.

महाराष्ट्रात कुठेही गुन्हेगारी किंवा अनुचित घटना घडली की त्याची तुलना ‘मुळशी पॅटर्न’शी केली जाते. त्यामुळे मुळशी तालुक्याची आणि येथील कष्टकरी, गुणवंत व कर्तृत्ववान नागरिकांची चुकीची प्रतिमा निर्माण होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यापुढे मुळशीचे नाव चुकीच्या संदर्भात वापरले जाऊ नये, यासाठी बैठकीत जाहीर ठराव मंजूर करण्यात आला.
मुळशी हा केवळ एका चित्रपटाच्या नावापुरता किंवा एखाद्या नकारात्मक संदर्भापुरता मर्यादित नसून त्याला समृद्ध सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा, शेतकरी, महाराष्ट्र केसरी पैलवान, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू, प्रशासनातील अधिकारी, डॉक्टर, वकील, अभियंते आणि गुणवंत विद्यार्थी घडविणाऱ्या या तालुक्याला उद्योजक, व्यावसायिक आणि माजी सैनिकांचीही गौरवशाली परंपरा लाभली आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी, गडकिल्ल्यांनी आणि लाल मातीने नटलेल्या मुळशीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदार-सैनिकांचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. सेनापती बापट यांचा सत्याग्रह आणि मामासाहेब मोहोळ यांची कुस्तीची परंपराही मुळशीच्या इतिहासातील महत्त्वाचा ठेवा असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
या लोकचळवळीला पुणे शहरातील विविध गणपती मंडळे, देवी मंडळे आणि सेवा सोसायट्यांनी लेखी पाठिंबा दर्शविला आहे. उपस्थित नागरिकांनीही जाहीर संमतीपत्र देत या उपक्रमाला समर्थन दिले.
बैठकीला मुळशीतील राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, शैक्षणिक, वारकरी, टाळकरी, उद्योजक तसेच तरुण पिढीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुळशीची खरी ओळख आणि गौरवशाली परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच तालुक्याची बदनामी रोखण्यासाठी सर्व मुळशीकरांनी पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
“मुळशीकर म्हणून एकजुटीने पुढे या, मुळशीची बदनामी थांबवा आणि मुळशीची खरी ओळख महाराष्ट्रासमोर आणा,” असा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.



