पुण्यात शिवसेनेला धक्का; किरण साळी, अजय भोसले यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र! आता पुढील नंबर कोणाचा?

पुण्यातील शिवसेनेचे पदाधिकारी किरण साळी आणि अजय भोसले यांनी राजीनामा देत शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्या नंतर या दोन नेत्यांच्या राजीनाम्यामुळे पुण्यातून आणखी कोण पदाधिकारी शिंदे गटात सामील होणार याबाबतीत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहे.
पुणे : शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड करत राज्यातील सत्तांतर घडवले असून महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर आता राज्यात भाजप आणि शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे गट असे सरकार आहे. या घडामोडीनंतर अनेक नेते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडत आहेत.
दरम्यान, एका बाजूला या घटना घडत असताना पुण्यात देखील शिवसेनेतून आउटगोइंग सुरु झाले आहे. एकनाथ शिंदेच्या भेटीनंतर शिवसेनेच्या युवा सेनेचे महाराष्ट्र सहसंघटक किरण साळी आणि सहसंपर्क प्रमुख अजय भोसले यांनी राजीनामा दिला आहे. साळी आणि भोसले यांचे पुण्यातील सेनेसाठी मोठे योगदान आहे.भोसले यांनी सर्वसामान्य नागरिकापर्यंत पक्ष पोहोचवला आहे त्याच प्रमाणे साळी यांनी देखील पक्षवाढीसाठी मोठे काम केले आहे. या तरुण नेत्याने अनेक आंदोलनात सहभाग नोंदवला असून हिंदुत्वाला विकासाच्या राजकारणाची जोड देत नेहमीच राजकारण केले आहे. अत्यंत निष्ठेने काम करणाऱ्या या दोन नेत्यांच्या राजीनाम्यामुळे सेनेत मोठी पोकळी निर्माण होण्याची शक्यता आहे










