राज आणि उद्धव ठाकरेही येणार एकत्र ? मुंबईत शिवसेना भवनसमोर लागले पोस्टर

मुंबई: अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्याने पुन्हा एकदा सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं असताना दुसरीकडे सर्वसामान्य मात्र राजकारणावर टीका करत आहेत. दरम्यान, अजित पवार यांच्या निमित्ताने राज्यात नवं राजकीय समीकरण जुळलेलं असताना दुसरीकडे पुन्हा एकदा ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचं आवाहन केलं जात आहे.
शिवसेना भवनासमोर पोस्टर लावत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे. आता तरी एकत्र या अशी आर्त हाक या पोस्टरमधून देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील राजकीय भूकंपानंतर मनसे कार्यकर्त्याने शिवसेना भवन परिसरात हे बॅनर लावले आहेत.

मनसैनिक लक्ष्मण पाटील यांनी हे बॅनर लावले असून, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे अशी साद घालण्यात आली आहे. या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांच्यासह राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे.
“महाराष्ट्राच्या राजकरणाचा चिखल झाला, राजसाहेब – उद्धवसाहेब आता तरी एकत्र या. संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे. एका महाराष्ट्रसैनिकाची हात जोडून कळकळीची विनंती,” असं लक्ष्मण पाटील यांनी या बॅनरवर लिहिलं आहे.



राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापन केली होती. यानंतर अनेकांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत यासाठी प्रयत्न केले होते. पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांनीही यांनी वारंवार ठामपणे नकार दिला आहे. पण आता अजित पवारांमुळे पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत यासाठी आवाहन केलं जात आहे. शिवसेना भवनासमोर तसे पोस्टरच लावण्यात आले आहेत. त्यावर राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे काही प्रतिसाद देतात का हे पाहावं लागणार आहे.



